लोणार (हॅलो बुलढाणा/यासीन शेख) ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला प्रतिसाद मिळत असून,अनेकांच्या खात्यात पैसेही पडलेत.मात्र आधार लिंक नसल्याने अनेकांच्या खात्यात छद्दामही पडला नाही त्यामुळे त्रृटी दुरुस्तीसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये महिलांची तोबा गर्दी होते.परंतु बँक कर्मचारी एक एक त्रुटी काढून बँकेचे उंबरठे झिजविण्या साठी मजबूर करीत असल्याने ‘लाडक्या बहिणी’ दिवसभर उपाशी ताटकळत राहून काम होत नसल्याचे अस्वस्थ चित्र आहे.शिवाय हातावर पोट असल्याने त्यांच्या हातांचे कामही बँकेने सद्यस्थितीत हिरावून घेतले आहे.
शासनाने या योजनेतून दरमहा 1500 रुपये असे दोन महिन्याचे 3 हजार रुपये 1 कोटी बहिणींच्या बँक खात्यात टाकले.मात्र अनेक बहिणींच्या बँक खात्यात आधार फीडिंग, आधार लिंक, इकेवायसी नसल्याने पैसे जमा झाले नाहीत.त्यामुळे बँकेत महिलांची तोबा गर्दी आहे.
अनेक महिलांच्या बँकेत खाते उघडण्यासाठी
सकाळी 7 वाजता पासूनच बँकेसमोर रांगा लागत आहे. त्यामुळे त्यांचा रोजगार बुडत असून शारीरिक व मानसिक त्रास होतोय. या गर्दीमुळे इतर व्यावसायिक व शेतकरी, नोकरदार लोकांचेही काम होत नसून बँकिंग आणि प्रशासकीय यंत्रणेवर पण त्याचा एकच ताण आला आहे. वास्तविक ज्या दिवशी बँकेत खाते उघडले त्याच वेळी आधार कार्ड, पॅन कार्ड, व इतर तांत्रिक गोष्टी बँक प्रशासनाने पूर्ण करून घ्यायला पाहिजे, परंतू वारंवार ग्राहकांना ekyc साठी व इतर तांत्रिक गोष्टी साठी बँक ‘लाडक्या बहिणींना’ त्रास देत आहे. प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रा वसंत मापारी यांनी केली आहे.