बुलढाणा (हॅलो बुलडाणा) दिव्यांगत्वाचे बोगस प्रमाणपत्र घेऊन तब्बल 359 उमेदवारांनी शासकीय नोकरी बळकावली आहे. आता मात्र हे ‘बोगस दिव्यांग’ शासनाच्या रडारवर असून,15 दिवसात त्यांची फेरमेडीकल तपासणी होऊन त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचा आदेश शासनाने जारी केला आहे. त्यामुळे या ‘बोगसकारांचे’ धाबे दणाणलेत. राज्यासह बुलढाणा जिल्ह्यातील अनेकांचा हा ‘बोगसपणा’ चव्हाट्यावर येणार आहे.यासंदर्भात आमदार बच्चू कडूंनी मागणी रेटली होती.शिवाय ‘हॅलो बुलढाणा’ने देखील बोगस दिव्यांगांची कुबडी ओढण्याचा प्रयत्न वृत्तमालिकेतून करून वरिष्ठस्तरावर पिच्छा पुरविला होता हे विशेष!
दिव्यांग बोगस प्रमणापत्रामुळे खऱ्या दिव्यांगावर अन्याय होत आहे. त्यामुळे आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांगाना न्याय देण्यासाठी दि.19 जुलै 2024 ते 3 ऑगस्ट 2024 दरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाकडून “बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध अभियान”
राबविले होते. याअभियानातून शासकीय व निमशासकीय सेवेत दाखल झालेल्या 359 उमेदवारांची नावे निदर्शनास आली. त्यामुळे या संशयित उमेदवारांची दिव्यांगत्व तपासणी करून त्यातील सत्यता पडताळणे आवश्यक असल्याचे आ. बच्चू कडूंना अपेक्षित होते. या उमेदवारांची दिव्यांगत्व व प्रमाणपत्र
फेरतपासणी करून त्याची पडताळणी करण्यातयावी व बोगस दिव्यांग सापडल्यास त्यांच्यावर कार्यवाही करुन सेवेतून बडतर्फ करण्यात यावे. तसेच त्यांच्या जागेवर प्रतीक्षा यादीतील दिव्यांग उमेदवार याची नियुक्ती करण्यात यावी.
ज्यांनी प्रमाणपत्र काढून दिले आहेत त्यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करावा. राज्यातील दिव्यांगाना न्याय देण्यासाठी आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व संबंधित प्रशासकीय विभागास सूचना देऊन दिव्यांग पडताळणी समिती तातडीने स्थापन करण्यात यावी व 15 दिवसात ही कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी शासनाकडे रेटून धरली होती. दरम्यान दिव्यांग कल्याण आयुक्तालयाचे आयुक्त प्रवीण पुरी यांनी याबाबतचा जीआर जारी केला आहे.दिव्यांग प्रवर्गातून नोकरी मिळविलेल्या उमेदवारांची फेर मेडिकल तपासणी करून खोट्या प्रमाणपत्रधारक उमेदवारांवर कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहे.15 दिवसात कारवाईचे आदेश असून, मोठा ‘बोगसपणा’ उघड होणार आहे.