बुलढाणा (हॅलो बुलढाणा) केंद्र व राज्याकडून पंतप्रधान कृषी सिंचन योजने अंतर्गत शेतकऱ्यांसाठी ‘प्रति थेंब अधिक पीक’ घेण्यासाठी तुषार, ठिबक सिंचन योजना राबविण्यात येते. मात्र,या ठिबक व तुषार सिंचन संचाचे 2023- 24 मधील 72 कोटी रुपयांचे अनुदान थकले आहे. दरम्यान हे प्रलंबित अनुदान खात्यात जमा करण्यासाठी आज मोताळा तालुक्यातील भोरटेक येथील राजू गायकवाड व अन्य शेतकऱ्यांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. यावेळी मागण्यांचे निवेदन देऊन आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी पाण्याचा संरक्षित वापर करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 80 टक्के अनुदानावर ठिबक, तुषार संच पुरविण्यात येतात. ‘महा-डीबीटी’च्या माध्यमातून शेतकऱ्यांची सोडत (लॉटरी) पद्धतीने निवड केली जाते. दरम्यान खरेदी प्रक्रिया झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वितरित करण्यात येते. हे अनुदान केंद्र, तसेच राज्य शासन वितरित करते. मात्र शेतकऱ्यांचे तब्बल
ठिबक व तुषार सिंचन संचाचे 2023- 24 मधील 72 कोटी रुपयांचे अनुदान अद्याप मिळालेले नाही.
शासन थकित अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा करणार? असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे. दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी पदरमोड करून तर काहीं शेतकऱ्यांनी गावातील खासगी सावकरांकडून पैसे घेऊन ठिबक संच विक्रेत्यांचे पैसे भागविले आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी थकित अनुदान खात्यात जमा करावे व 2024- 25 या आर्थिक वर्षामध्ये ठिबक व तुषार सिंचन योजनेच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी लॉटरी पद्धतीने प्रक्रिया पूर्ण करावी,अशी मागणी निवेदनातून केली आहे. 15 दिवसाच्या आत मागणी पूर्ण न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.












