चिखली (हॅलो बुलढाणा/संतोष बाहेकर) सापाचे नाव काढताच भल्या भल्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. त्यात अजस्त्र अजगर म्हटला की, पाहणाऱ्याची बोबडीच वळते.चिखली तालुक्यातील किन्हाळा येथे एका शेतात अठरा फूट लांबीचा व 33 किलो वजनाचा अजस्त्र अजगर शेतकऱ्याला आढळून आल्याने पाहणाऱ्यांची भंबेरी उडाली.या महाकाय अजगराला सर्पमित्र देवा खरात यांच्या पुढाकारातून सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले.या अजगराला 5 ते 7 जणांना उचलावा लागला असून बुलढाणा येथील राणी बागेतील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आलाय.
चिखली तालुक्यातील किन्होळा येथे शेतकरी गणपत बाबा बाहेकर यांचे शेत आहे.या शेतामध्ये भवानीदास बाहेकर काल फेरी मारत असताना,त्यांना तब्बल 18 फूट लांबीचा व 33 किलो वजनाचा महाकाय अजगर आढळून आल्याने त्यांच्या अंगावर शहाराच आला.त्यांनी गोंधळलेल्या स्थितीत किन्होळा येथील सर्पमित्र देवा खरात यांना मोबाईल वरून सदर घटनेची माहिती दिली.वेळ न दवडता सर्पमित्र खरात शेतात पोहोचले.मोठ्या कसरतीनंतर या अजस्त्र अजगराला सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आले.हा अजगर 18 फूट लांब आणि 33 किलो वजनाचा असल्यामुळे त्याला 5 ते 7 जणांनी सुरक्षित उचलून जीवनदान दिले आहे. हा थरारक प्रसंग प्रभू काका बाहेकर,दिनकर नाना,राजूभाऊ खरात,शेख अन्सार भाई, अभिजीत राजपूत, अमोल बाहेकर , सरदार अहमद भाई, सिद्धार्थ वानखेडे, नितीन धंदर यांच्यासह अनेकांनी अनुभवला.
या भल्या मोठ्या अजगराला पाहणाऱ्यांची बोबडी वळली होती.शेतातील शेतकरी व शेतमजूर भयभीत झाल्याचे दिसून आले.
▪️सर्पमित्र देवा खरात म्हणाले..
शेतकऱ्यांनो काळजी घ्या!
शेत परिसर, माळरान, जंगल हे तर सापांचे आश्रयस्थान आहे. त्यामुळे आपल्या शेतात सापांचे अस्तित्व आढळल्यास शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, मात्र सापांना इजा करू नये. त्यांच्यापासून शेतकऱ्यांना लाभच आहे. शेत परिसरातील साप तेथील उंदरांवर नियंत्रण ठेवतात, पर्यायाने शेतीचे नुकसान टाळले जाते.साप आढळल्यास माहिती द्यावी असे खरात म्हणाले.










