बुलढाणा (हॅलो बुलढाणा) स्वातंत्र्य दिन सोहळ्यात ज्यांचा सन्मान झाला त्यांना हा गौरव निश्चितच अविस्मरणीय आहे .78 व्या स्वातंत्र्याच्या महोत्सवात जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे बुलढाणा शहरवासीयांना सर्पमित्र एस.बि. रसाळ यांना त्यांच्या निस्वार्थ सर्पसेवा आणि निसर्ग सेवे बरोबर कालपरत्वे दुर्मिळ होत असलेल्या वस्तू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून उपयोगी पडावे म्हणून त्रिशिका प्राचीन वस्तू व नाणी नोटा संग्रह इत्यादी माध्यमातून करीत असलेल्या समाजसेवेबद्दल त्यांचा जिल्हाधिकारी डाॅ किरण पाटील यांच्या हस्ते कुटुंबासमवेत सन्मानित करण्यात आले.परंतु ही केवळ नागपूजा ठरवू नये.. त्यांची फरपट कोण थांबविणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
जीव धोक्यात घालून सर्पमित्र सेवा बजावतात.
कुठे साप निघाला की, फोनची घंटी खणाणते.
सर्पमित्र वाटतील त्या ठिकाणी जातात. सर्पमित्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विषारी व बिनविषारी सापांना पकडून, त्यांना सुरक्षित जंगलात सोडतात. मात्र, सर्पमित्राला सापाने दंश केल्यास त्यांचे प्राण जाऊ शकतात. अनेक सर्पमित्रांचे प्राण गेल्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावरही पडले आहे. शासनाने सर्पमित्रांकडे दुर्लक्ष न करता त्यांना ओळखपत्र, विमाकवच व मानधन देण्याची मागणी होत आहे.वन्य जीव संवर्धनाची जबाबदारी वन विभागाची असते; परंतु सापांच्या संरक्षणाच्या बाबतीत हा विभाग पूर्णतः उदासीन दिसून येतो. बुलढाणा जिल्ह्यातील सर्पमित्र मात्र प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून हे साप पकडत आहेत. पकडलेल्या सापांना कुठल्याही प्रकारची इजा न होऊन देता त्या सापांना सुरक्षित स्थळी सोडले जाते. मिळेल तो मोबदला घेत सापांच्या प्रति असलेल्या प्रेमपोटी ही मंडळी रात्रंदिवस साप वाचविण्याचे काम करत असतात. वन्य जीव संवर्धनावर करोडो रुपये खर्च करणारे सरकार मात्र या सर्पमित्रांना दुर्लक्षितच ठेवत आहे. अनेक वर्षांपासून मागण्या करून देखील कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. कुठलेही सुरक्षा साधने पुरविली जात नाहीत. ना कुठला विमा न कुठले मानधन. अशा परिस्थितीत देखील हे सर्पमित्र निस्वार्थी भावनेने सापांना वाचविण्याचे काम करत आहेत.त्यामुळे यांचा खरा सन्मान होणे गरजेचे आहे.