(कविवर्य ज्ञानेश वाकुडकर यांची कविता ‘हॅलो बुलढाणा’च्या वाचकांसाठी’ जशाच्या तशी देत आहोत..)
हे माझ्या प्राणप्रिय स्वातंत्र्या..
पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसलाच तू आमच्या देशात आलास
पण ..
आल्या आल्या कळलं नाही कुठे गायब झालास!
वाटलं होतं लगेच तू आमच्याही वस्तीत येशील
थोडा थोडा प्रकाश तुझा प्रत्येकाला देशील
प्रकाशाची आरास मांडू.. तिरंगा उंचावर टांगू
तू आमच्याही वस्तीत आलास..हे ओरडून ओरडून सांगू
पण..
कुठे काय गडबड झाली काहीच कळले नाही
अजूनही आमच्या वस्तीतले दिवेच जळले नाहीत !
दोस्ता.. अरे तुझी वाट पाहून थकलीत
आमची जीर्ण मोडकी दारे..
अन स्वातंत्र्या..
निदान या वर्षी तरी तू येणार आहेस कारे?
# #
ठीक आहे..
आमच्याकडे नाही आलास आम्ही समजून घेवू
सवयीप्रमाणे पुन्हा आणखी अर्धपोटी राहू
पण स्वातंत्र्या..
अरे तुझ्याच साठी संसाराची माती केली ज्यांनी
तोफेच्या तोंडासमोर छाती केली ज्यांनी
तुझाच जयजयकार होतां ..मनी तुझा ध्यास होतां
अंगामध्ये मस्ती होती..गळ्यामध्ये फास होतां
मानेभोवती फासाची दोरी घट्ट पडत होती..
बायकापोरं केविलवाणी टाहो फोडून रडत होती
पण..
तरीसुद्धा तुझ्याच साठी जे ‘शहीद’ झाले सारे..
अन स्वातंत्र्या
निदान त्यांच्या घरी तू जावून आलास कारे ?
# #
स्वातंत्र्या ..
माहित नाही तुझी नक्की कोण लागत होती..
पण..’भगतसिंगाची माय’ परवा भिक मागत होती!
अरे..
तिचाही पोरगा वेडा होतां..तुझ्याचसाठी मेला..
मरता मरता आईला अनाथ करून गेला
त्याच्याही कानात भरले होते..तुझ्याच प्रेमाचे वारे
अन स्वातंत्र्या…
निदान त्याच्या घरी तू जायला नकोस कारे ??
~~~~
ज्ञानेश वाकुडकर
नागपूर..