मलकापूर(हॅलो बुलढाणा/रविंद्र गव्हाळे) दाताळा येथील शैक्षणिक क्षेत्रात सतत उपक्रमशील व भरीव कामगिरी करणाऱ्या डी.ई.एस.हायस्कूल व ज्यू. कॉलेज दाताळा येथील अटल टिंकरिंग लॅब मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे विद्यार्थी पुष्कर अनंत पाटील व श्लोक विजय चौधरी, त्यांचे मार्गदर्शक शिक्षक श्री व्ही.पी.नारखेडे तसेच पालक श्री अनंत बळीराम पाटील यांना यावर्षीच्या 15 ऑगस्ट 2024 स्वातंत्र्य दिनासाठी भारत सरकारचे विशेष आमंत्रित पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची संधी प्राप्त झाली आहे.
डी.ई.एस.हायस्कूल व ज्यु. कॉलेज दाताळा येथे मागील चार वर्षापासून अटल इनोवेशन मिशन भारत सरकार अंतर्गत अटल टिंकरिंग लॅब सुरू आहे. या अंतर्गत दरवर्षी होणाऱ्या अनेक राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण यश संपादन केलेले आहे.या लॅबमध्ये विद्यार्थी डिझाईन व संगणकीय कौशल्याचा वापर करून नवीनतम तंत्रज्ञान कौशल्य व उपकरणांची निर्मिती करतात.या शाळेतील विद्यार्थी आपले नियत नियमित शिक्षणासोबत अतिरिक्त वेळेत सातत्यपूर्ण नवनिर्मिती करतात. सदर विद्यार्थी व शिक्षकांच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील या उल्लेखनीय कामगिरीची नोंद अटल इनोवेशन मिशन व नीती आयोग, भारत सरकार यांनी घेतली असून स्वातंत्र्यदिनास भारत सरकारचे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी दिनांक 12 ते 16 ऑगस्ट 2024 कालावधीचे निमंत्रण प्राप्त झाले आहे. संपूर्ण भारतातील अटल टिंकरिंग अंतर्गत अटल मॅरेथॉन या राष्ट्रीय नवोपक्रम स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट चमुंना 15 ऑगस्ट 2024 च्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेले आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील ही एकमेव शाळा आहे.हे विद्यार्थी व शिक्षक आज स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. सदर विद्यार्थी व शिक्षकांच्या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. देवेंद्र पाटील,सचिव श्री. एन.टी.पाटील, श्री.पी.पी.खर्चे तथा संचालक मंडळ, प्राचार्य, उपप्राचार्य,सहकारी शिक्षकवृंद, कर्मचारी व परिसरातील नागरिक कौतुक व अभिनंदन करीत आहेत.














