नवी दिल्ली – जर एखाद्या व्यक्तीने देशातील कोणत्या न्यायालयात खटला दाखल केला तर तो खटला आपली घटना आणि आपल्या कायद्यानुसार चालवला जातो. शरिया किंवा हदीसनुसार नाही. समान नागरी कायदा हा काही भारतीय जनता पार्टीचा अजेंडा नाही तर आपल्या देशाच्या घटनाकारांनीच हे म्हटले आहे अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समान नागरी कायदा अर्थात यूसीसीचे समर्थन केले.
हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन या सगळ्यांनी एका कायद्यानुसार जगले पाहिजे. कोणाच्याही धार्मिक स्वातंत्र्यात हस्तक्षेप व्हायला नको. भारताने यूसीसीच्या मूलभुत सिध्दांताचा स्विकार केला आहे. देशाची घटना तयार करणारे कॉंग्रेसचे नेते होते व त्यांनीही हे मान्य केले की योग्य वेळी राज्यांतील विधानसभा आणि संसद या देशात यूसीसी आणेल. हा आदर्श त्यांनी आपल्या समोर ठेवला होता.
शहा पुढे म्हणाले की शरिया आणि हदीसनुसार तर चोरी करणाऱ्याचे हात कापले पाहिजे आणि बलात्कार करणाऱ्याला रस्त्यावर उभे करून दगड मारून ठार केले पाहिजे. कोणत्याही मुस्लिमाने कोणत्या बँकेत बचत खाते उघडायला नको. ते व्याजही घेऊ शकत नाहीत आणि कर्ज घेऊ शकत नाहीत. जर शरिया आणि हदीसनुार जगायचे असेल तर पूर्णपणे तसे जगले पाहिजे.
केवळ चार लग्न करायच्या वेळीच शरिया आणि हदीसचा मुद्दा का येतो? असे व्हायला नको. आपल्या देशातील मुसलमान इंग्रजांच्या काळापासूनच शरिया आणि हदीसमधील गोष्टींपासून तुटला आहे. अनेक इस्लामिक राष्ट्रांनीही ते कायदे सोडले आहेत असे शहा यांनी नमूद केले.