बीड: राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेसीबी मालकांवर गुन्हे दाखल करणे बंद करावे. अन्यथा मी महाराष्ट्रात फिरुन मराठा समाज जागा करेन, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले.
मनोज जरांगे पाटील हे आज बीडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. मनोज जरांगे पाटील यांच्या बीडमध्ये झालेल्या इशारा सभेत वापरण्यात आलेल्या जेसीबी मालकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. यावर बोलताना म्हणून जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले की, मुख्यमंत्री गुन्हे दाखल करणार नाहीत असे म्हणतात आणि गृहमंत्री गुन्हे दाखल करायला लावतात. हे गुन्हे दाखल करणे थांबले नाही तर परवापासून महाराष्ट्राचा दौरा करावा लागेल आणि संपूर्ण मराठा समाज जागा करावा लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
सरकारला मराठा समाजाबद्दल द्वेष आहे म्हणून बैठकांना परवानगी नाकारली जाते. मनोज जरांगे पाटील यांची परळीमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. याच बैठकीला सुरुवातीला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, नंतर जरांगे पाटील यांना बैठक घेण्यास सशर्त परवानगी देण्यात आली. यावरच बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, सरकारमध्ये अनेक भ्रष्टाचारी लोक आहेत त्यांना कायदा लागू होत नाही का? राजकीय नेते सभा घेतात त्यांना परवानगी मिळते मग आम्ही सामाजिक बैठका घेऊ शकत नाहीत का? असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला असून सरकार जरी आमच्यासोबत अन्यायाने वागत असलं तरी न्यायदेवता योग्य न्याय करेल, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.