साखरखेर्डा (हॅलो बुलढाणा) सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघातील अनेक समस्या सोडविण्यासाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष गायत्रीताई गणेश ( मुन्ना ) शिंगणे यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश मोर्चा ५ ऑगस्ट रोजी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे काढण्यात येणार आहे. या मोर्चात साखरखेर्डा तालुका मागणीला बगल देऊन अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत.
एक प्रकारे साखरखेर्डा परिसरातील नागरिकांच्या समस्या काय आहेत . याचा विचार करण्यात आला नाही . असा सुर जनतेतून उमटत आहे .
गायत्रिताई शिंगणे यांची ओळख माजीमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांची पुतणी म्हणूनच आहे . सहकार महर्षी स्व . भास्करराव शिंगणे यांची नात आणि एकेकाळी लढवय्या युवा नेते गणेश उर्फ मुन्ना शिंगणे यांची ती मुलगी असा परिचय आहे . सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे यांनी १९७५ ते १९९२ या काळात बुलढाणा जिल्ह्यात सहकारी साखर कारखाने , सुत गिरणी , जिल्हा सहकारी बँक , ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे जाळे निर्माण करुन बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून दिला होता . पैनगंगा सहकारी सुत गिरणी , साखरखेर्डा येथे स्थापन करुन साखरखेर्डा येथे जिनिंग फॅक्टरी , बीबी येथे कापूस खरेदी केंद्र यासह अनेक संस्था उभ्या केल्या आहेत . कापूस एकाधिकार योजना संपुष्टात आल्यानंतर अनेक ठिकाणची खरेदी केंद्र बंद झाली . आजोबा आमदार असताना त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेऊन या मतदार संघात काय पोकळी निर्माण झाली याचा अभ्यास करून गायत्रीताई शिंगणे यांनी मतदार संघ पुन्हा बळकट करण्यासाठी कंबर कसली आहे . माजीमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी अजीतदादा पवार यांच्या गटात प्रवेश करुन शरदचंद्र पवार साहेब यांच्या गटात अस्वस्थता निर्माण झाली होती . शरदचंद्र पवार साहेबांनी ही पोकळी भरून काढण्यासाठी घरातच डाव टाकल्याची चर्चा सुरू झाली आहे . तसे पाहता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दोन नावे समोर आली आहेत . परंतू त्यांनी अधिकृत कोठेही प्रवेश केल्याची बातमी आली नाही . मराठा लाॅबीतली एक तरुण चेहरा म्हणून गायत्री शिंगणे यांच्याकडे पाहिले जात आहे . सिंदखेडराजा मतदार संघात त्यांनी हळूहळू पाय पसरायला सुरुवात केली आहे . काॅग्रेस , उध्दव ठाकरे शिवसेना पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हजर झाल्या आहेत .
सिंदखेडराजा मतदार संघात रस्ते , जिजाऊ स्मारकासाठी निधी उपलब्ध करून स्मारकाचे काम सुरू करण्यात यावे , साखरखेर्डा , बीबी , देऊळगाव मही नगरपंचायत करण्याची मागणी , जिजामाता सहकारी साखर कारखाना सुरु करावा , पैनगंगा सहकारी सुत गिरणी सुरु करावी . यासह अनेक मागण्या त्यांनी केल्या आहेत . प्रत्येक बसस्थानकावर बॅनरही झळकत आहेत . ह्या सर्व मागण्या मांडीत असताना साखरखेर्डा भागातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी काय त्रास होतो . तहसील कार्यालयात अधिकारी नसतात . कर्मचारी पैसे घेतल्या शिवाय काम करीत नाही . येण्याजाण्यासाठी वाहतूक व्यवस्था नाही . कृषी अधिकारी कार्यालय साखरखेर्डा येथे असताना , ते दुसरबीड येथे हलवून कार्यालय मात्र सिंदखेडराजा येथे आहे . कृषी पर्यवेक्षक , कृषी सहाय्यक साखरखेर्डा भागातील एकाही गावात नाही . साखरखेर्डा येथील लोकसंख्या २५ हजार असून साखरखेर्डा परिसरात ८५ गावे संभाव्य तालुका निर्मीतीच्या प्रतिक्षेत आहेत . ह्या जनसामान्यांच्या मागण्या आक्रोश मोर्चात सामील नाहीत . विशेष म्हणजे गायत्री शिंगणे यांचे गाव शेंदुर्जन असतांना या भागातील नागरिकांच्या समस्या त्यांनी घ्यायला पाहिजे होत्या . असा सुर जनतेतून उमटत आहे . गायत्री शिंगणे यांनी आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला ही बाब स्वागतार्ह आहे . कारण जनतेच्या समस्या काय आहेत हे मांडण्यासाठी नागरिकांना लोकनेता हवा असतो . आपल्या संघर्षात काकांचा सहभाग अप्रत्यक्ष निश्चितच नसेल . परंतू ही संघर्षाची तुतारी कितपत यशस्वी होईल हा येणारा काळच ठरवेल!