साखरखेर्डा (हॅलो बुलडाणा / दर्शन गवई ) साखरखेर्डा येथे बी एस एन एल ची सुविधा मिळावी म्हणून ग्राम पंचायतीने ई – क्लास जमीन दान दिली . त्या जमीनीवर भव्य इमारत उभी राहिली , परंतू कर्मचारी आणि ग्राहकांना योग्य सुविधा न मिळाल्याने आज साखरखेर्डा येथील बी एस एन एल कार्यालय शेवटची घटका मोजत आहे की काय ! अशी अवस्था झाली आहे . झाडाझुडुपांमध्ये वेढले गेलेले कार्यालय आणि त्यातील अद्ययावत यंत्रणा पुन्हा कात टाकून सुरु होईल काय याची प्रतिक्षा नागरिकांना लागली आहे .
केंद्र सरकारने बी एस एन एल ची सुविधा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे . ग्रामीण भागात त्याचे नेटवर्कर पसरविण्यासाठी टावर उभारण्यास परवानगी दिली आहे . बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय मंत्री ना प्रतापराव जाधव यांनी टावर उभे करण्याची घोषणा केली . आज मोबाईल कंपन्यांचे जाळे एवढे वाढले आहे की , प्रत्येक कंपनीने योजनांचा महापूर आणून ग्राहकांच्या खिशातून पैसे कसे काढता येईल यासाठी मोबाईलवर अनेक सुविधा करुन ठेवलेल्या आहेत . त्या माध्यमातून छुप्या पद्धतीने आपला पैसा काढल्या जात आहे . खाजगी मोबाईल कंपन्यांचे जाळे पसरण्यापुर्वी केंद्र सरकारच्या मालकीची भारतीय दुरसंचार निगम लिमिटेड ही कंपनी कार्यरत होती . प्रचंड नफा कमविणारी कंपनी असताना खाजगी कंपन्याचा शिरकाव यात झाला . कालांतराने शासनाने बी एस एन एल कडे असलेले लक्ष दुर्लक्षीत केले . अनेक ठिकाणी असलेले कर्मचारी कमी करुन अनेक मोठमोठी कार्यालय ओस पडली . साखरखेर्डा येथे बी एस एन एल ची टोलेजंग इमारत उभी राहावी यासाठी तत्कालीन सरपंच रविंद्र पाटील यांनी ई – क्लास जमीन दान दिली होती . मोठी इमारत उभी राहिली . साखरखेर्डा गावातील व्यापारी , उद्योजक , कर्मचारी , मध्यमवर्गीय यांच्या घरात फोनची बेल खनखनू लागली . २००८ साली ग्रामीण भागात सर्वप्रथम बी एस एन एल चे सिमकार्ड आले . एका कार्डसाठी ग्राहकांनी ७०० ते ८०० रुपये खर्च करून कार्ड मिळविले . त्यासाठी एक एक महिना वेटींग वर राहावे लागले . तरीही ग्राहकांनी बी एस एन एल वरच विश्र्वास होता . परंतू परिस्थिती बदलली आणि सेवा सुरळीत न मिळाल्याने साखरखेर्डा , मोहाडी , सवडद , शेंदुर्जन , शिंदी , गोरेगाव , बाळसमुंद्र यासह अनेक गावातील फोन बंद झाले . साखरखेर्डा कार्यालयात वाॅचमन नाही , ऑपरेटर नाही . तक्रार घ्यायला कोणीही उपलब्ध नसल्याने आठ वर्षांपासून साखरखेर्डा येथील सेवा कोलमडून पडली आहे . केंद्र सरकारने पुन्हा एकदा बी एस एन एल ची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाऊल उचलले आहे . ही बाब स्वागतार्ह आहे . यात काहीही दुमत नाही . परतू साखरखेर्डा सारख्या गावातील दुरसंचार निगम लिमिटेड कार्यालयात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन ग्रामीण भागात सुविधा उपलब्ध करून द्याव्यात ही अपेक्षा आहे .