बुलढाणा (हॅलो बुलढाणा) संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास कोट्यावधी अर्ज ऑनलाईन व ऑफलाइन अर्ज प्राप्त झाले असून त्यामध्ये लाखो अर्ज मराठी मधून भरण्यात आले आहे. परंतु जिल्हा प्रशासनाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांनी मराठीमध्ये प्राप्त अर्ज रद्द करण्याचे निर्देश देऊन मराठी भाषेचा अपमान केल्याने मनसेच्या वतीने 31 जुलै रोजी काळ्या फिती लावून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
याबाबत सविस्तर असे की, गेल्या काही दिवसांपासुन मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनचे संपुर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ऑनलाईन व ऑफलाइन स्वरुपाचे अर्ज भरणे सुरु आहे. सदरचे अर्ज मोबाईल ॲप्सद्वारे त्यामध्ये उपलब्ध असलेल्या महाराष्ट्रातील सर्वांना समजेल अशा स्थानिक मराठी भाषेमध्ये महिलांनी मराठीत अर्ज भरलेले आहे. परंतु जिल्हास्थरावरुन निर्देशीत केल्यानुसार 30 जुलै रोजी तहसिलदार, मोताळा यांनी एका परिपत्रका द्वारे आदेश पारीत केला
असुन सदर आदेशात असे स्पष्टपणे नमुद केले की, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनचे अर्ज मराठीमध्ये असल्यास रद्द करण्यात यावे. सदरचे काम पाच ऑगस्ट पूर्वी करावयाचे असल्याने नेमुण दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी असे आदेश दिले आहे. त्यामुळे संपुर्ण बुलडाणा जिल्हयातील महिलांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला. महाराष्ट्र शासनाचे नारीशक्ती दूत ॲप्स असून सदरच्या ॲपमध्ये अर्ज भरताना मराठी व इंग्रजी भाषेचा पर्याय दिलेला होता. महाराष्ट्राची अभिजात भाषा मराठी असल्याने जवळपास महिलांनी मराठी भाषेचा पर्याय निवडला त्यामध्ये फक्त इंग्रजी भाषेतच अर्ज भरावा अशी कुठलीही टीप किंवा सूचना देण्यात आलेली नव्हती मात्र तरीसुद्धा प्रशासनाची मराठी भाषा विषयी नकारात्मक भूमिका का ? शासनाचे ॲप्स मध्ये मराठी भाषा उपलब्ध असताना जिल्हाधिकारी यांनी चक्क मराठी भाषेलाच नकार दिला आहे. मराठी ही महाराष्ट्राची अभिजात भाषा असतांना त्यांना मराठी भाषेचा द्वेष का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तरी सदरचा आदेश तात्काळ रद्द करुन ज्या महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे अर्ज मराठी भाषेमध्ये भरलेली आहे त्या सर्वांचे अर्ज स्विकारुन तात्काळ निकाली काढण्यांत यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यांत येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कापसे, मनसे रस्ते स्थापना जिल्हा संघटक प्रदीप भवर, चिखली शहर अध्यक्ष नारायण बाप्पू देशमुख , तालुका सचिव प्रवीण देशमुख, उपतालुकाध्यक्ष संदीप नरवाडे, शहर सचिव अजय खरपास, मनविसे तालुकाध्यक्ष अंकित इंगळे, दिनकर खरपास, विभाग अध्यक्ष निशांत गायकवाड यांसह अन्य मनसे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.