बुलढाणा (हॅलो बुलढाणा) धकाधकीच्या, कष्टाच्या, दुःखाच्या क्षणांनी भांबावलेल्या मराठी माणसाला आपल्या कलांद्वारे मोहित करण्याची किमया साधणाऱ्या लोककला आणि लोककलावंत आता काळाच्या पडद्याआड लुप्त होत आहेत. विशेष म्हणजे लोककलेचे उपासक उपेक्षित असून त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. कारण गेल्या 3 महिन्यांपासून कलावंत मानधनापासून वंचित आहेत.
मागील 3 महिन्यापासून वयोवृद्ध साहित्यिक, कलाकारांचे मानधन त्यांच्या खात्यात जमा झाले नाही. याचा वयोवृद्ध कलावंतांना मनस्ताप सहन करावा लागत असून त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने तात्काळ त्यांचे मानधन खात्यात जमा करावे अशी मागणी लोक कलावंत फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध घोषणा जाहीर करीत आहे मात्र कलावंतांना मिळणाऱ्या अनुदान वेळेवर देत नसल्याने वृद्ध कलावंतांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. काही दिवसांपूर्वी शासनाने सर्व मानधन लाभार्थ्यांची यादी आधार कार्ड आणि मोबाईल नंबर अद्यावत करण्याचे काम सुरू केले होते. जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी आपापले मोबाईल नंबर प्रमाणीकरण करून सुद्धा त्यांना त्यांच्या हक्काचे अनुदान अद्यापही
मिळाली नाही ही एक प्रकारे थट्टा आहे.
▪️ मागण्यांवर दृष्टिक्षेप..
शासनाने तात्काळ 3 महिन्याचे अनुदान कलावंतांच्या खात्यावर जमा करावे तसेच कलावंतांना घरकुल मिळालेच पाहिजे,एसटी व रेल्वे प्रवास मोफत मिळावा, कलावंतांना विश्रामगृहात आरक्षण मिळावे, कलावंतांच्या पाल्यांना सरकारी नोकरीत 10% आरक्षण मिळावे,नवीन प्रस्ताव सुरू करण्यात यावे, वृद्ध साहित्यिक कलावंत समितीवर नियमाप्रमाणे सदस्यांची निवड करण्यात यावी, अशी मागणी लोक कलावंत फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा समाज कल्याण अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा फाउंडेशन चे वतीने एका निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर लोक कलावंत फाउंडेशनचे अध्यक्ष अब्दुल रफिक कुरेशी ,शाहीर हरिदास खांडेभराड ,शाहीर प्रमोद दांडगे ,दीपक सावळे महाराज ,शरद वानखेडे, गणेश कदम आदींचे सह्या आहेत.