बुलढाणा (हॅलो बुलढाणा) रविकांत तुपकर यांची आघाडी की संघटना? या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे. रविकांत तुपकर यांनी आजच्या पुणे येथील बैठकीत मोठा निर्णय घेतला. त्यांनी महाराष्ट्रात छोटे मोठे सर्व घटक एकत्रित करून महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी
25 जागा लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. या बैठकीसाठी 27 जिल्ह्यातील शेतकरी नेते व कार्यकर्ते उपस्थित झाले होते. दरम्यान मा.खास. राजू शेट्टी यांना त्यांनी खडे बोल सुनावले.
‘अंगावर असेल तर प्रति हल्ला तर करावाच लागेल’असे म्हणत, तुम्ही स्वाभिमानीतून काढले परंतु जनतेच्या मनातील चोर कप्प्यात रविकांत तुपकर बसलेला त्याला कोणी काढू शकत नाही. असे सांगून तूपकरांनी शेट्टी यांचा चांगलाच समाचार घेतला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात भूमिका घेऊन संघटनेची हानी केल्याबद्दल रविकांत तुपकर यांना निष्काशीत करण्यात येत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून सांगण्यात आले. दरम्यान, संघटनेच्या यानिर्णयानंतर तुपकर यांनी पुण्यात शेकडो कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलविली होती. या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला.
शेतकरी चळवळीचा युवा चेहरा आणि आक्रमक नेतृत्व ही तुपकर यांची ओळख आहे. चळवळीतील नव्या-जुन्या सर्व प्रमुख पदाधिकारी व युवा कार्यकर्त्यांना एकत्र करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रविकांत तुपकर यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. तब्बल अडीच लाख मते घेत त्यांनी प्रमुख पक्षांसह राजकीय विश्लेषकांचे लक्ष वेधून घेतले. यामुळे तुपकरांसह त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर यांनी आता ‘नव्या लढाईचा निर्धार!’ केला आहे. ते महाराष्ट्रात 25 जागा लढविणार आहेत.