बुलढाणा (हॅलो बुलढाणा) काल जिल्हा सहकारी बँकेमार्फत नामदार मंत्री प्रतापराव जाधव यांचा सत्कार घेण्यात आला.सदर कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे होते.आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी “घर वापसीचे” संकेत दिले. आमचे दैवत शरद पवार असून आमचे तोंडातील व मनातील नेते हे शरद पवारच आहेत, फक्त जिल्हा सहकारी बँकेला वाचवण्यासाठीच अजित पवार गटासोबत गेल्याचे डॉ. शिंगणे म्हणाले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये व त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये महाआघाडीला अतिशय यश मिळाले असून महायुतीला मोठे नुकसान सहन करावे लागले.विशेषत: शिंदे गट व अजित पवार गट यामधील आमदार व खासदारांना मिळालेले अपयश पाहता पुढील विधानसभा निवडणुकीमध्ये संभाव्य “पानिपत” टाळण्यासाठी अनेक आमदारांनी घर वापसीचे संकेत दिले आहेत. त्यामध्ये पूर्वाश्रमीचे मंत्री व विद्यमान आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा अतिशय वरचा क्रमांक लागत असल्याचे बोलले जात आहे.
त्यातच गायत्री शिंगणे यांच्या रूपाने त्यांना घरातूनच आव्हान मिळाले आहे, डॉक्टर शिंगणे यांच्या या वक्तव्यावर बोलताना गायत्री शिंगणे म्हणाल्या की, आमदार शिंगणे साहेब हे नेहमी दोन्ही तबल्यावर हात ठेवून चालतात, ते अजित पवार गटात जातानाही कन्फ्युज होते व ते परत येताना आता अधिकच कन्फ्युज दिसत आहेत, त्यांनी माननिय शरद पवार यांना दिलेला धोका सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील लोकांना पचणी पडलेला नाही व त्याची प्रचिती त्यांना लोकसभा त्यांच्या आली आहे, डॉक्टर शिंगणे यांच्यावर असलेला रोष सिंदखेडराजा मतदार संघातील जनतेने लोकसभा निवडणुकीमध्ये मतपेटीतून दाखवून दिला आहे.डॉक्टर शिंगणे यांनी प्रचार केलेल्या, तीन वेळ खासदार राहिलेला प्रतापराव जाधव यांच्यापेक्षा अपक्ष उमेदवार यांना या मतदारसंघातून चौतीस हजारापेक्षा अधिक मतांची आघाडी मिळणे, हा डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचाच विधानसभा निवडणुकीआधीच झालेला पराभव आहे.त्यांच्या कालच्या वक्तव्यातून त्यांची हतबल मानसिकता दिसते, संभाव्य पराभव कसा टाळता येईल यासाठीच त्यांनी आता मा. शरद पवार यांचे कौतुक सुरू केली आहे, परंतु ज्यांच्या जीवावर जन्मभर सत्ता पदे उपभोगली त्या शरद पवारांना एकटे सोडून जाताना यांना कृतज्ञता आठवली नाही काय? असा खडा सवालही गायत्री शिंगणे यांनीकेला आहे.