बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मोठमोठ्या घोषणा आणि तात्काळ मान्यता, याला नागरिकच नाही तर लहान विद्यार्थी सुद्धा कंटाळलेला आहे. शासनाने 28 जून 2023 रोजी शालेय मोफत गणवेश या संदर्भात अध्यादेश काढला. परंतु हा अध्यादेश कागदावर असून, जिल्ह्यातील 15,6525 विद्यार्थी अद्यापही गणवेशापासून वंचित आहे.गणवेशासाठी शासन शिक्षण विभागाला कापड पुरविणार आहे. परंतु हे कापड कधी येणार ? असा प्रश्न विद्यार्थी गुरुजींना विचारताना दिसताहेत.
सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार असल्याची घोषणा तत्पूर्वी झाली आहे. विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता एकूण 75.60 कोटी, तर विद्यार्थ्यांना बूट आणि पायमोजे उपलब्ध करून देण्यासाठी 82.92 कोटी रुपये इतका निधी समग्र शिक्षा अभियानांतर्गत खर्च करण्यास मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे गणवेश शिवण्यासाठी कापड पुरविण्यात येणार आहे. परंतु बुलढाणा जिल्ह्यात अद्यापही कापड आले नाही. शाळा सुरू होऊन महिना उलटला. 15 ऑगस्ट जवळ येत आहे. तरीही विद्यार्थी गणवेशाविनाश दिसून येत आहेत. परिणामी अनेक पालकांनी विद्यार्थ्यांना पदरमोड करून गणवेश विकत घेऊन दिला आहे.
▪️आदेशात काय म्हटले आहे?
– मंत्रिमंडळाच्या 28 जून 2023 रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार हा अध्यादेश काढला आहे.
– यात मोफत गणवेश आणि एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजे या योजनेची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 223-24 पासून करण्यात येणार
– विद्यार्थ्यांना दोन गणवेश उपलब्ध करून देण्यासाठी प्रति विद्यार्थी सहाशे रुपये, याप्रमाणे 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता एकूण 75.60 कोटी रुपये
– एक जोडी बूट आणि दोन जोडी पायमोजे देण्याकरिता प्रति विद्यार्थी 170 रुपये
– समग्र शिक्षा अभियानांतर्गत खर्च करण्यात मान्यता