धामणगांव बढे (हॅलो बुलढाणा) कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड व गजापूर येथील दंगलीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी धामणगाव बढे येथील मुस्लिम समाज बांधवांनी महामहिम राष्ट्रपती, राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री व अध्यक्ष अल्पसंख्याक आयोग यांच्याकडे धामणगाव बढे ठाणेदारांमार्फत गुरुवारी (18 जुलै रोजी) पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, विशाल गडावरील अतिक्रमणाच्या नावावर गजापूर गावातील अल्पसंख्याक समाजातील घरांवर हल्ले करून तोडफोड, जाळपोळ व मारहाण करण्यात आली. अतिक्रमण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान, विशाळगडावर मोर्चा निघणार याची माहिती असतानाही चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला नाही. कोल्हापूर ही राजर्षी शाहू महाराजांची भूमी आहे. दरम्यान,विशाळगडावरील घटनेने शाहू महाराजांच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम काही लोकांनी केले आहे. अतिक्रमणाच्या नावाखाली 40 ते 50 कुटुंबावर हल्ला करण्यात आला. त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तरी, सदर प्रकरणाची सीबीआय मार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच या घटनेत विशाल गडाखालील गजापूर गावातील ज्या कुटुंबांचे नुकसान झाले आहे, त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर शेख कलीम शेख बिस्मिल्लाह कुरेशी, तनवीर इकबाल पटेल, शेख अफसर शेख शफी, सय्यद बिसमिल्लाह, सईद कुरेशी, मुजीब कुरेशी, शेख अय्युब व मन्सुरी यांच्यासह मुस्लिम बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.














