बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आगामी बुलढाणा विधानसभा क्षेत्रात उबाठा शिवसेना आणि काँग्रेसकडे इच्छुक उमेदवारांची गर्दी दिसून येत आहे. बुलढाणा विधानसभा निवडणुकीचा गड उबाठा शिवसेना राखेल, असा दावा करण्यात येत आहे. काँग्रेसकडूनही ही विधानसभा आम्हीच जिंकू,अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षाकडे इच्छुकांची गर्दी वाढली आहे. शिंदे गट शिवसेना पक्ष मात्र मोर्चे बांधणी व संघटनात्मक कार्यावर भर देत असून, लोकसभेची जागा जिंकल्याने त्यांचा विश्वास दुणावला आहे.
विधानसभेसाठी मित्रपक्षाच्या इच्छुकांनीही दंड थोपटलेले आहे. पेचात टाकणाऱ्या या राजकीय कुरघोळीमुळे या घडामोडींचा सामना बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील शिंदे गट शिवसेना व भाजपला करावा लागणार आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील राजकारण सर्वश्रुत आहे. येथे काहीही उलटापालट होऊ शकते. तरीही अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याने विधानसभा निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार आहे. दरम्यान शिंदे शिवसेना गटाचे आयुष मंत्री प्रतापराव जाधव सलग चौथ्यांदा निवडून आल्याने बुलढाणा विधानसभा मतदारसंघावर त्यांचा सध्या प्रभाव आहे. तर उबाठा शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार माझी जिल्हा परिषद अध्यक्ष नरेंद्र खेडेकर यांनी दुसऱ्या नंबरची मते घेतल्याने ‘हम भी किसीसे कम नही’हे मतदारांना त्यांनी दाखवून दिले. शिवाय काँग्रेसने महाराष्ट्रात लोकसभेत ताकद वाढविली असून काँग्रेसचे देखील ‘अच्छे दिन’ आले आहे. असे असले तरी, या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचे विद्यमान आम. संजय गायकवाड, भाजपाचे विजयराज शिंदे, काँग्रेसच्या जयश्रीताई शेळके, शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर, उबाठा शिवसेनेचे प्रा.सदानंद माळी, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ, भाजपाचे योगेंद्र गोडे, काँग्रेसचे संजय राठोड, उबाठा शिवसेनेचे जालिंदर बुधवत,उबाठा शिवसेनेचे संजय हाडे , काँग्रेसचे टी. डी अंभोरे, भाजपचे मधुसूदन सावळे, राष्ट्रवादीचे नरेश शेळके, भाजपाचे (कीर्तीताई पराड- ध्रुपदराव सावळे यांची कन्या), भीम आर्मीचे सतीश पवार, बुलढाणा वन मिशनचे संदीप शेळके, माजी नगरसेविकाचे पती मोहम्मद सज्जाद अशी बरीच मोठी मंडळी इच्छुक आहे. मात्र कोण कोणत्या पक्षाची तिकीट मिळविणार? हे सांगता येत नाही. परंतु उबाठा शिवसेना पक्षाकडे आणि काँग्रेस पक्षाकडे इच्छुकांनी वरिष्ठांकडे भेटीगाठी वाढविल्या असून तिकीट मिळविण्यासाठी अनेक वाऱ्या केल्या आहे. त्यांच्या या कसरतीला किती यश मिळते हे येणारी वेळ सांगणार आहे.