बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरात मोकाट जनावरांच्या त्रासाने नागरिक, व्यावसायिक सारेच प्रचंड वैतागलेले आहेत. मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा होत असून, ते अपघाताचे कारण ठरू पाहत आहे. दरम्यान प्रशासनाने वेळीच कार्यवाही केली नाही तर रस्त्यावरील मोकाट जनावरे शासकीय कार्यालयात आणून उभी करणार, असा इशारा भीम आर्मी बुलढाणाचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी दिला आहे.
शहरातील रस्त्या- रस्त्यावर आणि चौका- चौकात मोकाट जनावरांच्या बसलेल्या झुंडीमुळे वाहतुकीस अडथळा तर होतोच अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे.मोकाट गुरांच्या उपद्रवामुळे येथील नागरिकांसह वाहनधारक तसेच व्यावसायिक पुरते हैराण झाले आहेत.आधीच भटकी कुत्री व डुकरांचा उपद्रव आहे, त्यात आता मोकाट जनावरांची डोकेदुखी वाढल्याने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सतीश पवार यांनी केली आहे. प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे अन्यथा मोकाट जनावरे शासकीय कार्यालयात उभी करू असा इशाराही पवारांनी दिला आहे.