बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ‘भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी!’ हे भक्ती गीत तमाम भाविकांच्या ओठावर रुंजी घालत आहे. असे म्हणतात की, अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर (गोरेगाव) येथील पुंडलिक महाराज यांनी फेकलेल्या विटेवर विठ्ठल पंढरपुरात विराजमान झाले.
‘हॅलो बुलढाणा’ला अभ्यासकांची माहिती माहिती मिळाल्यानुसार,
विठ्ठल आणि पंढरपूर यासंदर्भात तीन पुराणांमध्ये उल्लेख आला आहे. स्कंदपुराण, पद्मपुराण आणि विष्णुपुराण यामध्ये विठ्ठलाचा उल्लेख आहे. भगवान विष्णू रुसलेल्या माता रुख्मणी यांची समजूत काढण्यासाठी दिंडीरवन म्हणजे आजच्या पंढरपुरात आले होते. त्यावेळी त्यांना आपला भक्त पुंडलिक यांची आठवण झाली. भगवंत स्वत: मग पुंडलिक यांच्या दारी पोहचले. तेव्हा पुंडलिक आई-वडिलांची सेवा करत होते. त्यांना घरी कोणीतरी आले आहे, हे कळाले. त्यांनी मागे वळून पाहिल्यावर साक्षात परब्रम्ह भगवान विष्णू दाराशी आलेले दिसले. भगवंत पुंडलिक यांना आवाज देत होते. मग पुंडलिक यांनी त्यांच्याजवळ असलेली एक विट फेकली आणि देवाला म्हणाले, “या विटेवर उभा राहा. माझी आई-वडिलांची सेवा झाली की, मी तुमच्या दर्शनाला येतो.” भगवान विष्णू त्या विटेवर उभे राहिले. त्यानंतर आई-वडिलांची सेवा झाल्यावर पुंडलिक भगवंताकडे आले. त्यांनी भगवंताची क्षमा मागितली. परंतु भगवंत तर आपल्या भक्तावर प्रसन्न झाले होते. त्यांनी पुंडलिक यांना हवे ते वर मागण्यास सांगितले. भक्त पुंडलिक यांनी भगवंतांना त्याच विटेवर त्या ठिकाणी राहावे, अशी विनंती केली. मग भगवंत विटेवर पांडुरंग बनून, विठ्ठल बनून उभे राहिले. त्याच पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारीच्या माध्यमातून आषाढी अन् कार्तिकी वारीला लाखो भक्त राज्यभरातून जातात.
▪️ईश्वरी प्रेमाची विलक्षण अनुभूती म्हणजे वारी!
विशिष्ट तिथीला आपल्या इष्टदेवताकडे जाणे म्हणजे वारी. घरुन निघायचे, एखाद्या संताच्या गावी जायाचे आणि त्या ठिकाणावरुन निघणाऱ्या दिंडीसोबत पंढरपूरला जाणे म्हणजे वारी. पंढरपूरला जाऊन विठ्ठूरायाचे दर्शन ‘याची देही याची डोळा घेणे’ म्हणजे वारी. 18 ते 20 दिवस सर्व संसारीक वैभव, सुख सोडून फक्त ईश्वराच्या धान्यात राहणे म्हणजे वारी! वैष्णवांचा मेळा… भक्तांचा सागर…समानतेचा संदेश…कपाळावर टिळा… गळ्यात तुळशीची माळ अन् मुखाने हरिनाम असे दृश्य म्हणजे वारी! महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा म्हणजे वारी. महाराष्ट्राची ओळख म्हणजे वारी. महाराष्ट्राचे वैभव म्हणजे वारी. संतांची शिकवण म्हणजे वारी. ईश्वरी प्रेमाची विलक्षण अनुभूती घेण्याची संधी म्हणजे वारी आहे.