बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ज्या ठिकाणच्या रेल्वे स्टेशनवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चहा विकला त्याच “वडनगर” येथून बुलडाणा सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत 10 लाख 20 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला उचलून आणले आहे.एकेकाळी झारखंड राज्यातील “जामताडा” हे गांव सायबर गुन्ह्यासाठी प्रसिद्ध होते परंतु आता ऑनलाइन फसवणुकी मध्ये देशातील इतर शहरांची नावे जुडत आहे. त्यात गुजरात राज्यातील “वडनगर” उदयास येत आहे.
बुलडाणा शहराला लागून असलेल्या सुंदरखेड येथील रहिवासी अभिजीत अनिल जाधव वय 39 वर्ष यांनी 7 फेब्रुवारी 2024 ला बुलडाणा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की त्यांची शेअर मार्केटच्या नावाखाली 10 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक झालेली आहे.हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी तांत्रिक शोध लावला असता आरोपीचे लोकेशन हे वडनगर, जिल्हा म्हैसाना गुजरात येथील असल्याचे समोर आले. जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा सायबर पोलीस स्टेशन प्रमुख प्रकाश सदगीर, पोलीस कर्मचारी शकील खान,रामू मुंडे,राजदीप वानखेडे,क्षितिज तायडे व
विक्की खरात गुजरातच्या दिशेने रवाना झाले.वडनगर येथे पोहोचून आरोपी अनिलजी अर्जुनजी ठाकूर याचा शोध लावून त्याला ताब्यात घेतले आणो आज 13 जुलै रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास आरोपीला बुलडाण्यात आणले आहे.या आरोपीवर बुलडाणा, वडनगर तसेच हैदराबाद येथे देखील सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
…….
आरोपीला बुलडाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यास नकार
बुलडाणा सायबर पोलिसांचे पथक वडनगर येथे पोहोचले व स्थानिक पोलिसांना सोबत घेऊन आरोपीचा शोध लावून त्याला पकडून पोलीस ठाण्यात आणले. ठाण्यात आल्यानंतर वडनगरच्या ठाणेदाराने आरोपीला बुलडाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यास नकार दिला आणि आम्ही आमच्या गुन्ह्यात आरोपीला अटक करत आहोत असे म्हटले. जवळपास 800 किलोमीटर लांब जाऊन बुलडाणा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन सुद्धा रिकाम्या हाती परत कसे यावे? म्हणून पीआय प्रकाश दातीर यांनी सर्व माहिती बुलडाणा एसपी सुनील कडासने यांना दिली असता एसपी साहेबांनी तात्काळ म्हैसाना एसपीला कॉल करून घडलेला प्रकार सांगितल्यानंतर त्या एसपीने आरोपीला बुलडाणा पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे आदेश दिले.