बुलढाणा (हॅलो बुलढाणा) कितीही निधी आला तरी, नगरपालिका ‘मुंगी बनून साखर खाते..’त्यामुळे बुलढाण्यातील तलाव काही नामशेष झाले तर काही अखेरची घटका मोजत आहेत. न.प च्या कर्मचाऱ्यांनी आता तरी इमानेइतबारे ड्युटी करावी, आणि तलावातील जलपर्णी साफ करून जलजीवांना मुक्त करावे,अशी नागरिकांची मागणी आहे.
जलपर्णी वनस्पतीमुळे संगम तलाव धोक्यात आहे. नगरपालिकेच्या दुर्लक्षतेमुळे शहरातील तार तलाव, लेंडी तलाव केंव्हाचेच नामशेष झालेत. त्यातच इंग्रजकाळात शहराला पाणी पुरवठा करणार्या संगम तलावाला जलपर्णी वनस्पतीने विळखा घातला आहे. या तलावात दिवसे्दिवस जलपर्णीचे मोठमोठे बेटे तयार होत आहेत.या जलपर्णीचे लवकर उच्चाटन न केल्यास भविष्यात संगम तलाव धोक्यात येवू शकतो. इंग्रजांनी १८६७ साली थंड हवेच्या बुलडाणा शहराला जिल्ह्याचा दर्जा प्राप्त करून दिला होता. त्यावेळी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी शहराच्या चारही बाजुला तलावाची निर्मिती करण्यात आली होती. त्यामध्ये संगम तलाव, तार तलाव, लेंडी तलाव व सरकारी तलाव यांचा समावेश आहे. कितीतरी वर्षे शहराला संगम तलावातून पाणी पुरवठा करण्यात येत होता. तर लेंडी तलाव व तार तलाव यांचा वापरासाठी व कपडे धुण्यासाठी वापर करण्यात येत होता. परंतु स्वातंत्र्यानंतर या चारही तलावाला अवकळा प्राप्त झाली आहे. नगरपालीकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे तार तलाव व लेंडी तलाव केंव्हाचेच नामशेष झाले आहेत. तर आता इंग्रजकालीन पाणी पुरवठा करणार्या संगम तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.