मलकापूर (हॅलो बुलढाणा/करण झनके) संकटात आलेल्या दुग्ध व्यवसाय संदर्भात आ.राजेश एकडे यांनी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले.
यावेळी आमदार राजेश एकडे दुधावरील शासनाचे अत्यल्प अनुदानाचे वास्तव सुद्धा विशद केले. दरम्यान राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेकडून त्या सदर्भात तात्काळ दखल घेण्यात आली. जिल्ह्यातील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देतात. मात्र चारा, सरकी, ढेप आदींचे भाव गगनाला भिडलेले असल्यामुळे दुग्ध व्यवसाय चांगलाच संकटात आलेला आहे. पशुधनांना जगविण्यासाठी पशुखाद्याची नितांत गरज असते.पशुखाद्याचे भाव वाढल्यामुळे दुधाच्या उत्पन्नापेक्षा पशु चाऱ्यासाठी लागणारा खर्च हा मोठ्या प्रमाणात असतो. दुधाचा दर आणि खर्चाचा ताळामेळ हा मात्र कुठेच येत नाही. त्यामुळे दुग्ध व्यवसाय हा बंद करण्याच्या मनस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी आले आहे. महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या जनावरांना लागणारा चारा, पाणी, खाद्य यांचा खर्च सुद्धा दूध व्यवसायातून वसूल होत नसल्यामुळे तसेच शासनाने प्रति लिटर पाच रुपये असे दुधावर जे अत्यल्प अनुदान जाहीर केले आहे ते सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप पावतो मिळालेले नाही. पशुखाद्याच्या किमतीवर वर नियंत्रण ठेवून पशुखाद्याचे दर कमी करण्यात येतील का? अनुदानाची अत्यल्प रक्कम जी जाहीर केलेली आहे त्यामध्ये वाढ करण्यात येईल का? तसेच अनुदाना पासून वंचित असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेले अनुदान कधी मिळणार? असे महत्त्वाचे प्रश्न सुद्धा उपस्थित केले.