मेहकर (हॅलो बुलढाणा)शिवसेना ऊबाठाचे डॉ. गोपाल बच्छीरे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी केलेल्या आंदोलनाला अंशता यश मिळाले.
शेतकऱ्यांच्या मागण्या शासनाकडून मान्य करून घेण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक प्रा.डॉ. गोपाल बच्छीरे व त्यांचे सहकारी यांच्याकडून आमरण उपोषण सुरू केले होते. आज त्यास अंशतः यश मिळाले आहे. चार दिवस झालेल्या या आमरण उपोषणात उपोषणकर्त्याची प्रकृती चिंताजनक झाली होती. दरम्यान जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांच्या मध्यस्थीने डॉ.गोपाल बछिरे यांची भेट घेऊन कर्जमाफी, शेतमालास भाव, शेतकऱ्यास बारा तास वीज या मागण्यांचा शासनाकडे पाठपुरावा करून मागण्या पूर्ण करून घेऊ तसेच इतरही मागण्या पूर्ण करण्यात येईल असे आश्वासित केले. दरम्यान १२ जुलै रोजी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्रभाऊ खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदरभाऊ बुधवत, यांच्या साक्षीने उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांच्या हस्ते नारळ पाणी देऊन उपोषण सोडविण्यात आले.