चिखली (हॅलो बुलढाणा) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रम सूचीमधील क्रमांक 7 वरील अभ्यास पत्रिका (M S 37 ) वाङ्मयीन प्रवाह – आंबेडकरवादी साहित्य या प्रकारामध्ये प्रा.बी. ए. खरात यांच्या वेदनेवरील फुंकर या आत्मकथनाची संदर्भ ग्रंथ म्हणून एम. ए. मराठीच्या अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात आली आहे .
वेदने वरील फुंकर हे दलित आत्मकथना मधील एक वेगळा प्रवाह म्हणून संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये खूप गाजलेलं आत्मनिवेदन असून या निवेदनाला थोर विचारवंत दिवंगत डॉ. गंगाधर पाणतावने सरांची अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना लाभलेली आहे .
डॉ . एस एम कानडजे, डॉ . अनिल सोनार, डॉ.फुला बागूल, डॉ . विजय नागरे, प्राचार्य डॉ . मोकाशी सर यांच्या सारख्या साहित्य क्षेत्रात उंची असलेल्या अनेक मान्यवरांनी वेदनेवरील फुंकरवर आपली समीक्षा शब्दबद्ध करून प्रमाणित केले आहे ज्याचा एक स्वतंत्र समीक्षा ग्रंथ डॉ . प्रमोद गोरोडे सर, परतवाडा यांनी संपादन करून 2016 मध्ये प्रकाशित केला आहे .
विशेष म्हणजे साहित्यातील एक उत्कृष्ट कलाकृती म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असलेले हे आत्मकथन भारताचे तत्कालीन पंतप्रधान मा डॉ . मनमोहनसिंग यांच्या अभिप्रायाने सुद्धा सन्मानित झालेले आहे .
हे आत्मनिवेदन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एम. ए. (मराठी ) च्या अभ्यासक्रमासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून लागल्यामुळे प्रा. बी. ए. खरातांच्या अक्षरावर प्रेम करणाऱ्या शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक तथा रासिक वाचकांमध्ये एक प्रकारची आनंदाची लाट उसळली असून परिसरात प्रा बी ए खरातांचे मनापासून अभिनंदन तथा कौतुक होत असतांना दिसत आहे.