साखरखेर्डा (हॅलो बुलढाणा) येथील ३३ के व्ही उपकेंद्रातील वीजपुरवठा २४ तासांपेक्षा जास्त वेळ होऊनही सुरु न झाल्याने साखरखेर्डा वासियासह २४ गावातील नागरिकांना अख्खी रात्र अंधारात काढावी लागली आहे. याबाबत एकही अधिकारी सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याची अनास्था अधोरेखित होत आहे.
साखरखेर्डा येथील लोकसंख्या २५ हजार असून साखरखेर्डा उपकेंद्रावर २४ गावे सलग्न आहेत. ११ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अचानक वीजपुरवठा खंडीत झाला. नेहमी प्रमाणे वीजपुरवठा खंडीत होत असल्याने ३० मिनिटाला लाईन सुरु होईल असे नागरिकांना वाटले. परंतू रात्री ९ पर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने ग्राहकांनी उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता मेहकर येथून बंद आहे. तेवढेच कारण मिळाले. परंतू वीजपुरवठा का खंडीत झाला याचे सकारात्मक उत्तर कोणीच दिले नाही . शेवटी सर्वच कर्मचाऱ्यांचे फोन बंद येत असल्याने लाईन सुरु होईल याची अपेक्षा सर्वांनी सोडून दिली आणि रात्रभर विजपुरवठा खंडीत राहिला. सकाळी वरिष्ठ अधिकारी यांना सरपंच सुनील जगताप यांनी संपर्क साधला असता त्यांनी तत्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले. आज १२ जुलै रोजी ११ : ३० वाजता वीजपुरवठा सुरु झाला आणि अवघ्या दोन तासात पुन्हा बंद झाला. तो पुन्हा सायंकाळपर्यंत सुरुच झाला नाही.आज शुक्रवार असल्याने आठवडी बाजाराचा दिवस..अनेक व्यापाऱ्यांचा व्यवसाय वीजेअभावी बंद ठेवावा लागला.यावर्षी खंडीत वीजपुरवठ्यामूळे नागरिक हैराण झाले आहेत. याची दखल कोण घेणार की सतत खंडीत वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागले. हे सांगता येत नाही. शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत.त्यांना सकाळी सहा वाजता शेतावर जावे लागते. सायंकाळी शेतातून घरी आले तर लाईन गुल झालेली दिसते. पाणी भरावे कसे.दळण चक्कीत अटकले,भाकरी कशी करावी यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. जर अशीच परिस्थिती साखरखेर्डा वासियांची राहिली तर गाव सोडून जावे लागले अशी परिस्थिती आहे. केवळ साखरखेर्डाच नव्हे तर पिंपळगाव काळे,हिवरा आश्रम हे दोन्ही उपकेंद्र बंद आहेत.त्यामुळे ६५ गावे कालपासून अंधारात आहेत
कर्मचारी काम करीत आहेत?
आमचे कर्मचारी काम करीत आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत होईल .
-हिरालाल जांभूळकर,
उपअभियंता, सिंदखेडराजा