बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा धगधगू लागले असून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करत गायकवाड यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टसह विविध कलमान्वये तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
६ एप्रिल रोजी पत्रकार परिषदेत बोलताना गायकवाड यांनी आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्यांविषयी अत्यंत खालच्या पातळीवरील व चारित्र्यहनन करणारे वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे आरोप पूर्णपणे खोटे, बेताल आणि समाजात चुकीचा संदेश देणारे आहेत, असा आरोप शिंदे यांनी केला आहे.
या वक्तव्यामुळे आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली असून मुलींच्या शिक्षणावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आश्रम शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या सन्मानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने सामाजिक वातावरण तणावपूर्ण झाले आहे.
विजयराज शिंदे यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले की, आम.गायकवाड यांची ही भाषा केवळ व्यक्तीगत नाही तर संपूर्ण महिला वर्ग व आदिवासी समाजाचा अपमान करणारी आहे. तसेच, यापूर्वीही त्यांनी अनेक भाजप नेत्यांविषयी अशाच प्रकारची खालच्या पातळीवरील वक्तव्ये केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
दरम्यान, गायकवाड यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी, अन्यथा न्यायालयीन मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.या प्रकरणामुळे बुलढाण्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











