बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरातील इकबाल चौक परिसर आज शुक्रवारी अक्षरशः रणांगण बनला. जुम्म्याच्या नमाजच्या वेळी एकाच समाजातील दोन गट आमनेसामने येत दगडफेक, लाठीहल्ला आणि प्रचंड गोंधळ उडाला. कारण ठरलं तब्बल 30 वर्षांपासून नमाज पठण करणाऱ्या हाफीज रहमत यांना अचानक रोखण्याचा निर्णय!
मिळालेल्या माहितीनुसार, जामा मशिद ट्रस्टमध्ये मागील काही वर्षांपासून अंतर्गत वाद पेटलेला होता. हाफीज रहमत यांच्या वाढत्या वयाचा दाखला देत ट्रस्टी इलियास कच्ची यांनी त्यांना नमाज पठणापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय समर्थकांना मान्य नव्हता आणि त्यातूनच ठिणगी पडली.
शुक्रवारी दुपारी सुमारे 2 वाजता नमाजची वेळ होताच हाफीज रहमत मशिदीत पोहोचले. त्यांना रोखण्याचा प्रयत्न होताच मशिदीच्या आतच वाद सुरू झाला आणि काही क्षणातच बाहेर तो भीषण संघर्षात बदलला. दोन गट एकमेकांवर तुटून पडले. दगडफेक, लाठ्या आणि आरडाओरड यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या हिंसाचारात 8 जण जखमी झाले असून त्यात दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याने परिस्थिती अधिकच चिंताजनक झाली आहे. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेतली. मात्र जमाव आक्रमक झाल्याने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त बोलवावा लागला. अखेर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून परिसरात कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे.
या घटनेमुळे बुलढाण्यात खळबळ उडाली असून मशिदीतील अंतर्गत वाद आता रस्त्यावर आल्याने सामाजिक तणाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.











