चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) किरकोळ कारणावरून पेटलेला वाद कसा भयंकर रूप धारण करतो, याचे धक्कादायक उदाहरण चिखलीजवळील चांदई गावात पाहायला मिळाले. सिम कार्ड विक्रीसाठी छत्री लावण्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद गुरुवारी (दि. ९ एप्रिल) थेट हाणामारीत परिवर्तित झाला. या घटनेनंतर गावात दोन गट आमनेसामने येत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, चिखली-जाफराबाद मार्गावरील चांदई येथे रस्त्यावर व्यवसायासाठी छत्री लावण्यावरून सुरुवातीला वाद झाला. मात्र दुसऱ्याच दिवशी हा वाद उफाळून आला आणि दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. काही जणांनी दुकानात घुसून मारहाण केली, तसेच नातेवाईकांनाही लक्ष्य केल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार भूषण गावंडे पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र दरम्यान काही जण तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असताना गावात पुन्हा संघर्ष उसळला. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत काही मोटरसायकली जप्त केल्या.
या प्रकरणात परस्परविरोधी तक्रारींवरून दोन गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. मंगेश भाऊराव जाधव यांच्या तक्रारीवरून पवन प्रकड, समाधान धुबळे, धनंजय इंगळे व ऋषिकेश इंगळे यांच्याविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ व मारहाणीप्रकरणी ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील करत आहेत.
तर दुसऱ्या बाजूने धनंजय गजानन इंगळे यांनी विशाल इंगळे व अन्य तिघांविरुद्ध तक्रार देत कमलाताई दूध डेरीत घुसून तोडफोड, ९५०० रुपयांची रोकड व एका महिलेचे दागिने जबरदस्तीने लुटल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीवरून दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डीवायएसपी सुधीर पाटील व ठाणेदार भूषण गावंडे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला असून दोन्ही गटांना शांततेचे आवाहन केले आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.










