spot_img
spot_img

BREAKING वॉटर पार्कमध्ये तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; लाइफगार्ड नसताना सुरू पार्क? व्यवस्थापनाचा बेफिकीरपणा उघड

देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा/संतोष जाधव) शहरातील खोलेश्वर महादेव मंदिर परिसरालगत असलेल्या वॉटर पार्कमध्ये आज दुपारच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली असून २२ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. शुभम भास्कर सदावर्ते (वय २२, रा. शेवली नेर, जि. जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभम हा नाशिक येथे कामासाठी राहत होता. तो आपल्या नातेवाईकांकडे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी देऊळगाव राजा येथे आला होता. कार्यक्रमानंतर मित्रांसोबत तो वॉटर पार्कमध्ये गेला. मात्र, मौजमजेच्या क्षणातच काळाने झडप घातली आणि पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेमुळे वॉटर पार्कच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनास्थळी योग्य लाइफगार्ड किंवा सुरक्षा व्यवस्था होती का, याबाबत संतप्त नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रशासनाने याची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!