बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बीजापोटी फळे रसाळ ही म्हण बुलढाण्यात अक्षरशः खरी ठरली! शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत आणि माजी जि.प. उपाध्यक्ष कमलताई बुधवत यांच्या कन्या शितल बुधवत हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत थेट राज्यातून 9वा क्रमांक पटकावत कर सहाय्यक पदावर झेंडा रोवला आहे.
बुलढाण्यातील भारत विद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथे पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत शितलने स्पर्धा परीक्षेच्या रणांगणात दमदार एन्ट्री घेतली. पुण्यातील कठोर मेहनत, शिस्त आणि ध्येयवेड या जोरावर तिने हे यश खेचून आणले.
वडील जालिंदर बुधवत हे केवळ राजकारणी नसून समाजकारणात अग्रेसर नाव आहे. त्यांच्या कार्याचा प्रभाव शितलवर ठळकपणे दिसून आला. “सरकारी सेवेतून समाजसेवा” हा मंत्र मनाशी बांधत तिने यश मिळवलं.
शितलच्या या दणदणीत यशामुळे जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, बुधवत कुटुंबाचा वारसा आता नव्या पिढीत झळकतोय! अशी चर्चा रंगली आहे. स्वतः शितलने या यशाचे श्रेय आई-वडील व गुरुजनांना दिले आहे.










