चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) शहरातील गजानन नगर परिसरात आज सकाळी झालेल्या भीषण अपघाताने खळबळ उडाली आहे. बांधकामावर काम करत असताना थ्री-फेज वीजतारांवर पडून 55 वर्षीय मिस्त्री अमजद खा युसूफ खा (रा. इंदिरा नगर, चिखली) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे 10 वाजेच्या दरम्यान अमजद खा हे दुसऱ्या मजल्यावर पालकावर उभे राहून सेंट्रिंग प्लेट लावत होते. यावेळी अचानक टी-प्लेट खाली घसरली आणि त्यांचा तोल जाऊन ते थेट बांधकामाला लागून असलेल्या उघड्या थ्री-फेज वीजतारांवर कोसळले. या धक्कादायक घटनेत ते गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर नागरिकांनी तातडीने त्यांना पानगोळे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, बांधकाम ठिकाणी सुरक्षेचे नियम पायदळी तुडवले जात असल्याचा आरोप होत आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.










