जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील पळशी सुपो येथे एक धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सततच्या मानसिक छळाला कंटाळून 21 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कु. गायत्री मोहन कोकाटे हिने डी.एड. शिक्षण पूर्ण केले होते आणि ती पुढील शिक्षणासाठी जळगाव जामोद येथे संगणक प्रशिक्षण घेत होती. तिचा विवाह 9 मे 2026 रोजी ठरलेला होता. मात्र, गावातीलच गौरव पुरषोत्तम खंडारे हा युवक तिला वारंवार त्रास देत होता. “माझ्याशी लग्न कर, नाहीतर आपले फोटो तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवेन,” अशी धमकी तो देत असल्याचा गंभीर आरोप आहे.
या धमक्यांमुळे तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांवर प्रचंड मानसिक ताण निर्माण झाला होता. अखेर या प्रकरणाची माहिती होणाऱ्या सासरच्या मंडळींना मिळाल्यानंतर त्यांनी लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. यामुळे तरुणी पूर्णपणे खचली.
शनिवारी (दि. 4 एप्रिल) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास गायत्री बराच वेळ खोलीतून बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी दरवाजा उघडून पाहिले असता ती सिलींग फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून संबंधित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.










