जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) येथील सातपुडा शिक्षण संस्थेच्या स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी व उद्यानविद्या महाविद्यालयात आयोजित कॅम्पस ड्राईव्हने विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या नव्या दारांना अक्षरशः उघड केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्न या महाविद्यालयात झालेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कृषी क्षेत्रातील नामांकित CropCrest India Private Limited आणि Agro Orbit Hub Private Limited या कंपन्यांनी थेट कॅम्पसवर येत विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. तज्ज्ञ पॅनलकडून मार्गदर्शनानंतर झालेल्या मुलाखतींमध्ये विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता प्रभावीपणे सादर केली.
या कॅम्पस ड्राईव्हमध्ये एकूण ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी कृषी महाविद्यालयातून १९ विद्यार्थ्यांची ‘एग्रीकल्चर फील्ड ऑफिसर’ पदासाठी निवड झाली, तर १२ विद्यार्थिनी ‘सेल्स अँड बिझनेस डेव्हलपमेंट’ पदासाठी निवडल्या गेल्या. उद्यानविद्या महाविद्यालयातून १० विद्यार्थ्यांची फील्ड ऑफिसर पदासाठी, तर १६ विद्यार्थिनींची बिझनेस डेव्हलपमेंट पदासाठी निवड झाली. एकूणच ५७ विद्यार्थ्यांना थेट नोकरीची संधी मिळाल्याने महाविद्यालयात आनंदाचे वातावरण आहे.
या यशस्वी उपक्रमासाठी प्राचार्य प्रा. योगेश गवई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. अविनाश आटोळे, प्रा. अमोल चोपडे, प्रा. प्रमोद डव्हळे, प्रा. वैभव जाधव यांच्यासह प्राध्यापकांनी विशेष मेहनत घेतली.
शिकत असतानाच रोजगार ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत या कॅम्पस ड्राईव्हने विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा दिली आहे.










