चिखली (हॅलो बुलडाणा /सैय्यद साहील) दिवसभर कष्ट, अंगात नसलेली शक्ती आणि उद्याच्या पोटाची चिंता… या सगळ्यांवर मात करत एक आई आपल्या लेकरासाठी जगते, हे दृश्य सध्या चिखलीत हृदय पिळवटून टाकणारे ठरत आहे. आई रेणुका मातेच्या यात्रेदरम्यान टिपलेले हे चित्र अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणणारे आहे.
दिवसभर उन्हातान्हात उभी राहून खेळणी विकणारी ही महिला रात्री उशिरा आपल्या लहान बाळाला त्याच गाडीत झोपवून घरी परतताना दिसते. तिच्या हातातील खेळण्यांची गाडीच तिच्या बाळासाठी ‘पाळणा’ बनली आहे. गाडीच्या खालच्या भागात कापडी झोळी बांधून त्यात बाळाला सुरक्षित ठेवत ती शांतपणे रस्ता पार करते.
ज्या वयात बाळांनी मऊ बिछान्यावर झोपायला हवे, त्या वयात हे लेकरू आईच्या कष्टाच्या प्रवासाचा भाग बनले आहे. घरात सांभाळायला कोणी नसल्यामुळे ती बाळाला सोबत घेऊनच दिवसभर व्यवसाय करते. खेळणी विकली तरच संध्याकाळी चूल पेटते, या वास्तवामुळे तिच्यासाठी कष्टाशिवाय पर्याय नाही.
रात्री उशिरा दुकान आवरून उरलेली खेळणी आणि बाळाला घेऊन ती मैलोन्मैलचा प्रवास करते. मात्र, गाडीत शांत झोपलेल्या बाळाकडे पाहताच तिचा सगळा थकवा दूर होतो. हीच आईच्या मायेची खरी ताकद आहे.
हे दृश्य समाजाला एक मोठा धडा देणारे आहे. एका बाजूला उत्सवातील उधळपट्टी, तर दुसऱ्या बाजूला जगण्यासाठीची ही झुंज ही दरी स्पष्टपणे दिसून येते.
या माऊलीचा प्रवास फक्त रस्ता पार करण्याचा नसून, आपल्या लेकराच्या भविष्यासाठी परिस्थितीशी दिलेल्या लढ्याचा आहे. तिच्या या जिद्दीला आणि मातृत्वाला ‘हॅलो बुलढाणा’चा सलाम!










