बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अतिसाराला प्रतिबंध करण्यासाठी दि. 1 जुलै ते 31 ऑगस्ट दरम्यान स्टॉप डायरिया अभियान राबवण्यात येत आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांना आळा घालण्यासाठी स्टॉप डायरिया अभियान प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले.
स्टॉप डायरिया अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी आज दि. 8 जुलै रोजी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात जिल्हास्तरीय कार्यशाळा पार पडली. सदर अभियान जिल्हा परिषद पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, आरोग्य विभाग, पंचायत विभाग, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभाग यांच्या वतीने राबविण्यात येत आहे.
श्री. जंगम यांनी अभियानादरम्यान पाणीपुरवठा योजनेतील गळती थांबवणे, शाळा, अंगणवाडीतील शौचालयाची दुरुस्ती, पाण्याच्या टाक्या नियमित स्वच्छ करणे, लोकसहभागातून परिसर स्वच्छता करणे, महिलांना स्वच्छता आणि आरोग्याबाबत प्रशिक्षण देणे, एफटीके किटद्वारे पाण्याची नियमित रासायनिक व जैविक तपासणी करण्याचे निर्देश दिले. स्टॉप डायरीया अभियानांतर्गत अतिसाराबाबत व्यापक जनजागृती करून उघड्यावरील पाणी जमिनीत मुरविण्यासाठी शोषखड्डे तयार करणे, महिलांना आरोग्याचे प्रशिक्षण देणे आदी उपक्रम अभियानादरम्यान राबविण्यात येणार आहे.
ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जाधव, आरोग्य विभागाचे माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव, प्राथमिक शिक्षणाधिकारी डी. आर. खरात, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.