बुलढाणा (हॅलो बुलढाणा) काल दि. २५ रोजी बुलढाणा हेड पोस्ट ऑफिसला आलेल्या एका धक्कादायक ई-मेलमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली. संबंधित ई-मेलमध्ये राज्यातील सर्व पासपोर्ट आणि टपाल कार्यालयांमध्ये दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तब्बल १६ आरडीएक्स बॉम्बस्फोट होणार असल्याची गंभीर धमकी देण्यात आली होती. “तात्काळ सर्वांना बाहेर काढा” असा इशाराही मेलमध्ये देण्यात आला होता.
या अतिसंवेदनशील धमकीची गांभीर्याने दखल घेत पोस्ट प्रशासनाने तात्काळ ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ग्रामीण पोलिसांनीही वेळ न दवडता तपासयंत्रणा सक्रिय करत घटनास्थळी धाव घेतली. बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) पाचारण करण्यात आले आणि संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात आली.
तपासणीनंतर कोणताही स्फोटक पदार्थ आढळून आला नसून “घाबरण्याचे कोणतेही कारण नाही” असा निर्वाळा BDDS पथकाने दिला आहे. दरम्यान, पोस्ट अधिकाऱ्यांनीही नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करत सर्व सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्याची माहिती दिली.
या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी पोस्ट ऑफिसचे नियमित कामकाज सुरळीत सुरू असल्याचे पोस्टमास्टर यांनी स्पष्ट केले.










