बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्हा परिषदेत बोगस दिव्यांगांच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर अखेर प्रशासनाने लोखंडी हात दाखवला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी थेट १५ कर्मचाऱ्यांना निलंबित करत जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडवली आहे. ‘यह तो झाकी है, पूरा पिक्चर अभी बाकी है’ असा इशारा देत या कारवाईची ही केवळ सुरुवात असल्याचे संकेत मिळत आहेत.
युडीआयडी (Unique Disability ID) कार्ड नसतानाही शासकीय सवलती उचलणाऱ्या १२ सहायक शिक्षक, २ ग्रामपंचायत कर्मचारी आणि १ परिचर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, ५५ संशयित कर्मचाऱ्यांना पडताळणीसाठी वारंवार संधी देऊनही १५ जण तपासणीस गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर संशय अधिक गडद झाला आणि अखेर निलंबनाचा दणका बसला.
निलंबितांची नावे अशी:
गजानन गुलाबराव बेलोडे, भगवान श्रीराम पवार, राजू पांडुरंग सोळंके, विकास पांडुरंग बाहेकर, संनिता अनुप बाहेकर, सुभाष प्रल्हाद अंभेरे, नंदा देवीसिंग हाडे, रंगनाथ कल्याणराव गावडे, परमेश्वर उत्तम शेळके, मनोहर समाधान जुमडे, खान अनिस खान इस्माईल, अंबिका महादेव अढाव, गणेश विश्वनाथ कोथळकर, गजानन सखाराम सारखे आणि संदीप पांडुरंग चव्हाण.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, शासनाच्या सवलतींचा गैरवापर करणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असा कडक संदेश प्रशासनाने दिला आहे. काहींकडे युडीआयडी कार्डच नव्हते, तर काहींच्या प्रमाणपत्रांवर गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत.
दरम्यान, या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील इतर ‘बोगस’ लाभार्थ्यांचे धाबे दणाणले असून, लवकरच आणखी शेकडो प्रकरणांचा भांडाफोड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. “खऱ्या दिव्यांगांना न्याय मिळेपर्यंत आमची मोहीम थांबणार नाही,” असा इशाराही देण्यात आला आहे.










