spot_img
spot_img

व्हॉट्सअॅप पोस्टची ठिणगी… दुसरबीडमध्ये रक्तरंजित रणांगण!

दुसरबीड (हॅलो बुलढाणा) रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअॅपवर टाकलेल्या भडक आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्टमुळे दुसरबीडमध्ये एकाच समाजातील दोन गटांमध्ये भीषण रक्तरंजित संघर्ष उसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

वार्ड क्रमांक ६ मध्ये सुरू झालेला किरकोळ वाद काही वेळातच हिंसक वळण घेत दोन्ही गट आमनेसामने आले. संतप्त जमावाने लाठ्या, काठ्या, लोखंडी रॉड आणि विटांनी एकमेकांवर हल्ला चढवत अक्षरशः रणांगण तयार केले. या हल्ल्यात राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस इरफानअली शेख, सहारा मित्र मंडळाचे जाकेर शेख, सामाजिक नेते जुनेद अली, अफसर अली, वसीम शेख यांच्यासह अनेकांना लक्ष्य करण्यात आले. जखमींची अवस्था गंभीर असून त्यांना तातडीने जालना येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या संपूर्ण घटनेमागे स्वतःला कायदेतज्ञ म्हणवणाऱ्या नौशाद शेख याने सोशल मीडियावर टाकलेली भडक पोस्ट कारणीभूत ठरल्याचा आरोप होत आहे. ईदगाह मैदानाच्या कामावरून समाजात नाराजी असल्याचा खोटा आभास निर्माण करून वातावरण पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

तसेच तंटामुक्ती अध्यक्ष नसतानाही पदाचा गवगवा करणाऱ्या याकुब ऊर्फ नसीर शेख आणि त्याचे सहकारी इम्रान शेख, निसार शेख यांच्यासह इतरांनी नियोजनबद्ध पद्धतीने हल्ला केल्याची चर्चा रंगली आहे.

विशेष म्हणजे, आमदार मनोज कायंदे यांच्या निधीतून ईदगाह मैदानाच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना काहींना हे विकासकाम खटकल्यानेच हा वाद चिघळल्याचा आरोप पुढे येत आहे.

घटनेनंतर पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!