बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरात चोरट्यांचा धुमाकूळ थांबायचे नाव घेत नाही. एकता नगर परिसरात भर रस्त्यात एका महिलेला लक्ष्य करत दोन अज्ञात इसमांनी धक्कादायक पद्धतीने सोन्याची साखळी हिसकावून नेल्याची घटना समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सौ. विजया अनिल कोल्हे (वय 56) या गजानन महाराज मंदिरातून दर्शन घेऊन घरी परतत असताना ही घटना घडली. सायंकाळी सुमारे 7.15 वाजता, दोन अज्ञात इसम मोटारसायकलवरून आले आणि पत्ता विचारण्याचा बहाणा करत अचानक त्यांच्या गळ्यातील सुमारे 1.5 तोळ्यांची (अंदाजे 60 हजार रुपये किंमतीची) सोन्याची मनीगंठण पोथ हिसकावून पळ काढला.
घटनेनंतर महिला घाबरल्यामुळे वाहन क्रमांक लक्षात ठेवू शकली नाही. आरोपींपैकी एकाने काळा तर दुसऱ्याने राखाडी टी-शर्ट घातला होता. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे.










