spot_img
spot_img

BREAKING चिखलीच्या आ.श्वेता महाले यांचा आ.संजय गायकवाडांवर पलटवार:त्यांची दमदाटी, दादागिरी चालू आहे! RTIचा दबाव टाकून पक्षप्रवेश? आ.महालेंचा गंभीर आरोप!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ३५ कोटींच्या कथित “कमिशन” वक्तव्यावरून जिल्ह्यात उसळलेले राजकारण आता उघड संघर्षात बदलले असून युतीचे बुलडाणा आमदार संजय गायकवाड यांच्या आक्रमक भाषेला चिखलीच्या मित्र पक्ष्याच्या आमदार श्वेता महाले यांनी जोरदार खणखणीत प्रत्युत्तर देत भर उन्हाळ्यात तापमान वाढवले आहे.

चिखली मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावेळी शिंदे गटाचे आ.गायकवाड यांनी “कार्यकर्त्यांसाठी ३५ कोटींचे कमिशन सोडले” असा दावा केल्यानंतर विरोधकांनी हाच मुद्दा पकडून त्यांच्यावर हल्लाबोल केला.नंतर गायकवाड यांनी स्पष्टीकरण देत “कमिशन नव्हे, कामे दिली” असे म्हटले, तरीही संशयाचे ढग कायम आहेत.याच दरम्यान “कुणाची माय…मी बघतो!” असा इशारा देत त्यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले.

या पार्श्वभूमीवर आमदार श्वेता महाले यांनी संतप्त प्रतिक्रिया देत गायकवाडांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले. “ही भाषा सुसंस्कृत नाही. माझ्या मतदारसंघातील सरपंचांना जाणीवपूर्वक RTI अर्ज टाकून त्रास दिला जातो. दोन-तीन पत्रे टाकून त्यांना अडचणीत आणले जाते आणि नंतर ‘संजूभाऊंचा निरोप’ सांगत शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी दबाव टाकला जातो,” असा गंभीर आरोप महाले यांनी मीडिया समोर केला.

त्या पुढे म्हणाल्या, “ही सरळसरळ दमदाटी आणि दादागिरी आहे. काम सुरळीत करायचे असेल तर पक्षप्रवेश करा, असा दबाव टाकणे लोकशाहीस घातक आहे.” महाले यांच्या या वक्तव्यामुळे गायकवाडांवरचा राजकीय दबाव आणखी वाढला आहे.

दरम्यान, आमदार महाले यांचे पीए सुरेश इंगळे यांनीही सोशल मीडियावरून “वाचाळ लोक व शिक्षणाचा अभाव स्वतःच अडचणीत येतात” असा टोला लगावत वादात तेल ओतले आहे.

एकीकडे गायकवाडांची आक्रमक शैली, दुसरीकडे महाले यांचे थेट आरोप आणि महायुतीतील अंतर्गत कुरघोडी यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील राजकारण सध्या अक्षरशः पेटले असून ३५ कोटींचा मुद्दा आता मोठ्या राजकीय भूकंपात रूपांतरित होण्याची चिन्हे दिसत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!