शेगाव (हॅलो बुलडाणा) शहरातील अकोट रोड परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला असून, दर्शनासाठी गेलेल्या एका 23 वर्षीय विवाहित तरुणीला मंदिर परिसरातच छेडछाडीचा सामना करावा लागल्याने संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी 17 मार्च रोजी दुपारी लाल बाबा देवी मंदिरात दर्शनासाठी गेली असताना, विशाल भिवटे (रा. सावळी, ता. संग्रामपूर) हा तेथे येऊन तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. माझ्याशी का बोलत नाहीस? असे म्हणत आरोपीने तिचा हात पकडून वाईट हेतूने ओढले. तरुणीने आरडाओरडा करताच आरोपी तेथून पसार झाला.
इतकेच नव्हे, तर आरोपीने वारंवार पाठलाग करून “माझ्याशी लग्न कर, नाहीतर दुसऱ्याशी होऊ देणार नाही” अशी धमकी दिल्याचीही तक्रार आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पीडितेच्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.










