देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) बेकायदेशीर वाळू उत्खनन करून वाहनाने वाहणाऱ्या ‘पुष्पांना ‘ रोखणे गरजेचे आहे. काल देऊळगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी जवळखेड फाटा येथे धाडसाने टिप्परला ताब्यात घेत चालकाला अटक केली तर वाळू व टिप्पर सह 15 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
‘प्रयत्ने कण रगडिता वाळूचे तेलही गळे’ या कवितेला वाळू माफियांनी आजवर जिल्ह्यात उलटे टांगले आहे. कारण वाळूचे धोरण हे सांगते की कुठलेही कष्ट करण्याऐवजी वाममार्गाने दांडगाई करा आणि वाळूतून पैसे कमवा. ‘वाळूमाफिया’ हा गुन्हेगारी शब्द आता ग्रामीण व शहरी भागात रुळला आहे. सरकारांनीही तो रुजू दिला. हे माफिया इतके गब्बर झाले आहेत, की ग्रामपंचायत, महसूल यंत्रणा, पोलिस या कुणालाही न जुमानता ते थेट नदीपात्रात जेसीबी सारखी यंत्रे घेऊन उतरतात. अवाढव्य यंत्रांनी नदी पोखरतात आणि शहरांकडे वाळूच्या डंपरच्या रांगा लावतात. पोलिस पाटील, सरपंच, तहसीलदार, पोलिस अधिकारी हे सगळे हा उपसा उघड्या डोळ्यांनी पाहत राहतात. मात्र आता काही कारवाया करण्यात येत आहेत. दरम्यान देऊळगाव राजा पोलिसांनी आरोपींविरुद्ध अप. नं. 272/2024 कलम कलम 303 (2) 281 BNS सन 2023, सहकलम जमीन महसुन अधिनियम कलम 48 (7), 48(8) सन 1966, तसेच सहकलम गौण खनीज अधिनियम कलम 3,4 सन 1952, अन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलिसांनी टिप्पर क्रं MH-30-BD-0351 चा चालक ज्ञानेश्वर विश्वनाथ दहेकर वय 29 वर्षे रा. निमगाव गुरु याला ताब्यात घेतले. आरोपीकडून 4 ब्रास वाळु अंदाजे किंमत 16000 रू, टिप्पर क्रं MH-30-BD-0351 किंमत अंदाजे 15,00.000 रू.असा एकुण 15, 16,000 रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपी टिप्पर भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवुन टिप्परमध्ये अवैधरित्या विनापरवाना चार ब्रास रेती वाहतुक करतांना मिळुन आला. बुलढाणा जिल्ह्यातील इतरही भागात वाळू तस्कर सक्रिय असून या पुष्पांना यंत्रणेने झुकवावे अशी मागणी होत आहे.