चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) विदर्भातील शेतकरी आत्महत्यांच्या काळ्या इतिहासाची सुरुवात मानल्या जाणाऱ्या साहेबराव करपे यांच्या स्मृतीदिनी चिखलीत संतप्त वातावरण पाहायला मिळणार आहे. १९ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर नागरिक ‘अन्नत्याग’ करून शेतकऱ्यांच्या वेदनांना न्याय देण्यासाठी एकवटणार आहेत.
१९८६ मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथे साहेबराव करपे यांनी कर्जबाजारीपणा, नापिकी आणि व्यवस्थेच्या उदासीनतेमुळे कुटुंबासह आत्महत्या केली होती. “शेतकऱ्याला जगणं कठीण झालंय” हा त्यांचा आक्रोश आजही तितकाच जिवंत आहे. तीन दशकांनंतरही परिस्थिती बदलली नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
हा उपवास कोणताही राजकीय कार्यक्रम नसून, बळीराजाच्या वेदनांना आवाज देणारा सामाजिक एल्गार आहे. या वेळी शेतकरी आत्महत्यांवर तीव्र चर्चा आणि सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची शक्यता आहे.राजकारण विरहित समितीने नागरिकांना जाहीर आवाहन करत “एक दिवस शेतकऱ्यांसाठी द्या” असे सांगितले आहे.










