जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली असून दारू पिण्याच्या बहाण्याने मित्रानेच कट रचून तरुणावर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन प्रकाश खिरोडकर (वय 26, रा. पिंपळगाव काळे) हा मजुरी करून उदरनिर्वाह करतो. रविवारी (15 मार्च) दुपारी तो मित्रांसोबत मळ्यात गेला होता. सायंकाळी सुमारे 5 वाजता त्याने घरातून 1 लाख रुपये घेऊन बहीण सुनिता घुळे (रा. गोळेगाव बु.) हिच्या घरी जाण्यासाठी निघाला. मात्र मोटारसायकल पंचर झाल्याने तो पिंपळगाव काळे बसस्थानकाजवळील दुकानात गेला असता त्याला चेतन दिनेश राऊत (रा. पिंपळगाव काळे) भेटला.
चेतनने दारू पिण्याचा आग्रह केल्याने दोघे शिवराज धाब्यावर गेले. त्यानंतर चेतनने आणखी दारू पिण्याचे सांगून गजाननला दादुलगाव गावठाण परिसरात नेले. सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास तेथे चेतनचा एक अज्ञात साथीदार मोटारसायकलवर आला. त्याने गजाननकडे पैशांची मागणी करत चाकू काढून डोक्यावर वार केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या गजाननने तेथून पळ काढला.
दरम्यान, प्रसंगावधान राखत गजाननने पैसे सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवले आणि मदतीसाठी रस्त्यावरून जाणाऱ्या मोटारसायकलस्वाराची मदत घेत शिवराज धाब्यावर पोहोचला. त्यानंतर पुन्हा घटनास्थळी जाऊन त्याने लपवून ठेवलेले पैसे परत मिळवले.
या प्रकरणी गजानन खिरोडकर यांच्या तक्रारीवरून चेतन दिनेश राऊत आणि त्याच्या अज्ञात साथीदाराविरुद्ध जळगाव जामोद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.










