spot_img
spot_img

मलकापुरात व्यापाऱ्याला सापळ्यात अडकवून दरोडा; ‘स्वस्त बांबू’च्या आमिषाने कर्नाटकच्या व्यापाऱ्याला लुटले!

मलकापूर (हॅलो बुलडाणा) “स्वस्तात बांबू मिळवून देतो” असे आमिष दाखवत कर्नाटकातील एका व्यापाऱ्याला मलकापूर येथे बोलावून पाच जणांच्या टोळीने बेदम मारहाण करत तब्बल १ लाख ९६ हजार रुपयांची लूट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे मलकापूर शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

कर्नाटक राज्यातील चिकबळापूर येथील बांबू व्यापारी श्रीनिवास मूर्ती नारायणस्वामी हे बांबू खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी फेसबुकवर आपल्या व्यवसायासंदर्भात माहिती पोस्ट केल्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधत मलकापूर येथे अत्यंत कमी दरात बांबू उपलब्ध असल्याचे सांगितले. वारंवार फोन करून त्या व्यक्तीने त्यांना मलकापूरला येण्यास भाग पाडले. अखेर श्रीनिवास मूर्ती आपल्या चुलत भावासह कारने मलकापूरला आले.

आरोपींनी पाठवलेल्या लोकेशननुसार दोघे व्यापारी रेल्वे बोगद्याजवळील एका मोकळ्या जागी पोहोचले. तेथे एका व्यक्तीने त्यांना बांबूच्या गोदामात नेण्याचे सांगत निर्जन ठिकाणी नेले. मात्र तेथे आधीच दबा धरून बसलेल्या चार जणांनी अचानक हल्ला चढवला. पाचही आरोपींनी दोघा व्यापाऱ्यांना बेदम मारहाण करत त्यांच्या गळ्यातील १४ ग्रॅम सोन्याची चेन (सुमारे ५६ हजार रुपये) तसेच ५०० रुपयांच्या नोटांचे दोन बंडल (१ लाख रुपये) जबरदस्तीने हिसकावून घेतले.

इतक्यावरही आरोपी थांबले नाहीत. त्यांनी व्यापाऱ्यांच्या मोबाईलमधूनच ४० हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले आणि जीवे मारण्याची धमकी देत तेथून फरार झाले.

या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात निखिल संजय भोसले, प्रदीप सुरेश जैन, शाहरुख रहमान पिंजारे व इतर दोन अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन कवलसे करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!