छत्रपती संभाजीनगर (हॅलो बुलढाणा) शहरातील जळगाव रोडवर रविवारी (८ मार्च) सकाळी साडेअकराच्या सुमारास भरधाव वेगात धावणाऱ्या ब्रेझा कारने अक्षरशः थरार माजवला. बसस्थानक ते हर्सूल मार्गावर खा. काळे यांच्या घरासमोर ही भीषण घटना घडली. बेफाम वेगाने येणाऱ्या कारने आधी एका ऑटोरिक्षाला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर दुचाकीला उडवले. या भीषण अपघातात केटरर्स व्यवसाय करणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर रिक्षाचालक जखमी झाला.
या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव बुधाराम बिष्णोई (वय ३३, रा. बालाजीनगर) असे आहे. ते छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण भागात केटरर्सचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. रविवारी सकाळी ते त्यांच्या ओळखीचे सुनिल मोतीराम प्रजापती यांच्यासह दुचाकीने जळगाव रोडने हर्सूलकडे जात होते.
याच वेळी हर्सूलकडून सिडको बसस्थानकाच्या दिशेने भरधाव येणाऱ्या पांढऱ्या ब्रेझा कारने (क्र. MH 28 AZ 4147) अचानक दुभाजक ओलांडत त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या कारने याआधीच एका ऑटोरिक्षालाही उडवले होते. धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीस्वार बुधाराम बिष्णोई यांचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षाचालक जावेद शेख गंभीर जखमी झाले असून नागरिकांनी तत्काळ त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. अपघाताची माहिती मिळताच सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारचालक साहिल कैलास राऊत (रा. बुलढाणा) याला ताब्यात घेतले.
मृतकाचे भाऊ रमेश डूंगरराम बिष्णोई (वय ४२) यांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरून कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल नानेकर करत आहेत.












