बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या शिक्षिकेच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला अपघात म्हणून समोर आलेला हा प्रकार प्रत्यक्षात पतीने रचलेला थरारक सुपारी किलिंग कट असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
पातुर्डा येथील वृषाली प्रकाश गावंडे (वय ३७) या पिंपळगाव काळे येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका होत्या. २ मार्च रोजी कवठळ जवळ त्यांच्या स्कूटरला मालवाहू वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचे समजले, मात्र मृताच्या भावाने संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी सखोल तपास सुरू केला.
तपासात धक्कादायक सत्य समोर आले. घरगुती वादातून पती प्रकाश अनंत गावंडे याने पत्नीचा काटा काढण्याचा कट रचला. मित्र मंगेश चौहूलकरच्या माध्यमातून चालक मनीष सूर्यवंशी याला तब्बल १ लाख रुपयांची सुपारी देऊन अपघात घडवून आणल्याचे निष्पन्न झाले.
घटनेच्या दिवशी आरोपी चालकाने ‘टाटा छोटा हत्ती’ वाहनाने स्कूटरला मुद्दाम जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत वृषाली गावंडे यांचा जागीच मृत्यू झाला.
जळगाव जामोद पोलिसांनी पती प्रकाश गावंडे व चालक मनीष सूर्यवंशी यांना अटक केली असून मध्यस्थ मंगेश चौहूलकर फरार आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.












