चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) हातनी-चिखली-बुलढाणा रोडवर शुक्रवारी (दि.) संध्याकाळी सुमारे 7.30 वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोसंबेवाडी ता. जानेफळ येथील रहिवासी दत्तात्रय वाघ (वय 34) हे आपल्या दुचाकीने जात असताना हातनी–चिखली-बुलढाणा रोडवर समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीशी त्यांची जोरदार धडक झाली. या भीषण धडकेत दत्तात्रय वाघ यांच्यासह दुसऱ्या दुचाकीवरील सुमीत तेलरकर (रा. बुलढाणा) यांचा जागीच मृत्यू झाला. सुमीत तेलरकर हे वरुड नाका येथील बँकेच्या शाखेत कर्मचारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे.
अपघात इतका भीषण होता की दोन्ही दुचाकींचा अक्षरशः चुराडा झाला. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली आहे.या दुर्दैवी अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.












