spot_img
spot_img

बुलढाण्याची ‘गुगल गर्ल’! अवघ्या १० सेकंदांत भारतातील सर्व राज्यांची नावे; इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये दमदार नोंद

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील एका विद्यार्थिनीने आपल्या अफाट बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञानाच्या जोरावर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचा मान उंचावला आहे. डोणगाव येथील कु. कोमल देविदास खनपटे हिने अवघ्या १० सेकंदांत भारतातील सर्व राज्यांची नावे अचूक आणि सलग सांगत एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला असून तिच्या या उल्लेखनीय कामगिरीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे. या यशामुळे परिसरात कोमलला प्रेमाने “गुगल गर्ल” अशी ओळख मिळू लागली आहे.

मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील रहिवासी असलेली कोमल खनपटे ही श्री शिवाजी हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीची विद्यार्थिनी आहे. लहानपणापासूनच अभ्यासू, जिज्ञासू आणि सामान्य ज्ञानाची आवड असलेल्या कोमलने सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हा अनोखा विक्रम घडवून आणला. अवघ्या काही सेकंदांच्या कालावधीत भारतातील सर्व राज्यांची नावे सलग आणि अचूकपणे सांगणे ही सोपी गोष्ट नसताना कोमलने ते सहजतेने करून दाखवले.

तिच्या या चमकदार कामगिरीची दखल घेत India Book of Records कडून तिच्या नावाची अधिकृत नोंद करण्यात आली. यानिमित्त कोमलला प्रमाणपत्र, IBR पेन, रेकॉर्ड होल्डर ओळखपत्र, IBR बॅज आणि ‘Medal of Achievement’ देऊन गौरविण्यात आले.

कोमलचे वडील देविदास खनपटे हे पत्रकार असून त्यांच्या मार्गदर्शनामुळेच तिला लहानपणापासून सामान्य ज्ञानाची आवड निर्माण झाली. घरातून मिळालेल्या प्रोत्साहनामुळेच कोमलने हा विक्रम साकारल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, डोणगावसह संपूर्ण मेहकर तालुक्यात कोमलच्या या यशाचे कौतुक होत असून बुलढाण्याची ही “गुगल गर्ल” आज अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तिच्या या यशामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची नोंद झाली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!